INDIA आघाडीचा पंतप्रधान कोण? संजय राऊतांनी नावंच सांगून टाकलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) देशातील ७ व्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान आज सुरु असून ४ जूनला निकाल जाहीर होणार आहे. देशात भाजपप्रणीत NDA आणि विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीमध्ये थेट सामना आहे. भाजपकडून आमचीच सत्ता पुन्हा येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे तर विरोधकांना सुद्धा विजयाचा विश्वास आहे. जर इंडिया आघाडीची सत्ता आली तर ४८ तासांत नवा पंतप्रधान जाहीर करू असं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हंटल होते. त्यानंतर इंडिया आघाडीचा (INDIA Alliance) पंतप्रधान कोण असेल याबाबत चर्चा सुरु झाल्या. मात्र आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट नाव घेऊनच इंडिया आघाडीचा पंतप्रधान सांगितला आहे.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना इंडिया आघाडीची सत्ता आल्यास पंतप्रधान कोण असेल असा सवाल करण्यात आला. यावर उत्तर देताना संजय राऊतांनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधींचे (Rahul Gandhi) नाव घेतलं. मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी हे त्यांची चॉईस असल्याचं सांगितलं. मीही सांगतो, पंतप्रधान म्हणून संपूर्ण देशाची पसंती राहुल गांधी आहेत. आम्ही सर्व राहुल गांधी यांच्या पाठीशी उभे राहू. राहुल गांधींनी देशात ज्या पद्धतीने मेहनत घेतली आहे, त्याला तोड नाही. त्यामुळे देशानं राहुल गांधींना स्वीकारलं आहे. राहुल गांधींचं नेतृत्व जनतेने स्वीकारलं आहे, राहुल गांधी देशाचे नेतृत्व करतील असं संजय राऊत म्हणाले.

मोदींवर टीका –

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केरळमध्ये ध्यानस्त बसले आहेत यावरही राऊतांनी निशाणा साधला. मोदी कॅमेरा लावून ध्यानाला बसले आहेत. सर्व बाजूंनी कॅमेराच्या माध्यमातून मोदींच्या शरीराचा प्रत्येक भाग तुम्ही पाहू शकता. मोदींची ध्यानधारणा म्हणजे स्टंट आहे. 3000 सुरक्षारक्षक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रक्षा करण्यासाठी तेथे तैनात करण्यात आले आहेत. तो संपूर्ण रस्ता, मार्ग, परिसर बंद करण्यात आला आहे. याला ध्यानधारणा म्हणत नाही असं म्हणत संजय राऊतांनी मोदींवर टीका केली.