हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असताना दुसरीकडे अजून ही अपात्र आमदारांचा मुद्दा खोळंबलेला आहे. मुख्य म्हणजे, याप्रकरणी गेल्या काही दिवसांपूर्वीच शिंदे गटातील एकसुद्धा आमदार अपात्र होणार नाही असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केले आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. मात्र आता अपात्र आमदारांच्या कार्यवाही बाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना, आता लवकरच प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली जाईल असे सांगितले आहे.
गेल्या काही वेळांपूर्वीच राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी, “आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी संपूर्ण कायदेशी प्रक्रियेचं पालन केलं जाईल. तसेच सर्व नियमांचं आणि सांवैधानिक तरतुदींचं पालन केलं जाईल. त्यानुसारच याप्रकरणी कारवाई होईल. ही कारवाई लवकरात लवकर पार पडेल. यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही.” अशी माहिती दिली आहे.
त्याचबरोबर, आमदारांना बोलावून सुनावणी घेतली आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना, “अद्याप नाही, सुनावणी संदर्भात काही ड्राफ्ट इश्यूजसह इतर तयारी सुरू आहे. लवकरच प्रत्यक्ष सुनावणी होईल” असे सांगितले आहे. सध्या, आमदार अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीस विलंब केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने लावला आहे. तसेच, पक्षचिन्ह देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटांनी दाखल केलेली याचिका लांबणीवर पडली आहे.
मुख्य म्हणजे, ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरू असल्यामुळे ठाकरे गटाच्या याचिकेवर तीन ते चार आठवड्यानंतर सुनावणी घेतली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, “याप्रकरणात शिवसेनेच्या ४० व ठाकरे गटाच्या १४ आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत. ५४ आमदारांना नोटिसा पाठविल्या असून, न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्या आदेशांचे पालन केले जाईल” अशी माहिती माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.