हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सुप्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solanpurkar) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी एका मुलाखतीत बोलताना छत्रपती शिवाजी महाराज (Chattrapati Shivaji Maharaj) यांनी आग्र्याहून सुटण्यासाठी औरंगजेबाच्या पत्नीला लाच दिल्याचा दावा केला होता. यामुळेच त्यांच्यावर शिवप्रेमी, इतिहासकार, राजकीय आणि सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अखेर हा वाद टोकाला गेल्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी आपण केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे.
राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीत म्हणले होते की, छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटण्यासाठी लाच दिली होती. त्यावेळी कोणतेही पेटारे नव्हते. महाराजांनी औरंगजेबाच्या वजीर आणि पत्नीला लाच दिल्याचे पुरावे आहेत. त्यांनी मोहसीन खान किंवा मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही शिक्क्याचे पत्र घेतल्याचा उल्लेखही केला होता. या विधानामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात होती.
अखेर हा वाद वाढल्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी आपले मत स्पष्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “मी दीड महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत इतिहास आणि त्यातील रंजक गोष्टी कशा निर्माण होतात यावर भाष्य केले होते. शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेचा संदर्भ काही इतिहासकारांनी दिला आहे. परंतु माझ्या पूर्ण मुलाखतीतील दोन वाक्यं वापरून काही लोकांनी वाद निर्माण केला. महाराजांचा अपमान करण्याचा माझा हेतू अजिबात नव्हता. मात्र, बोलताना मी ‘लाच’ हा शब्द वापरला, त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही अन्यायकारक मार्ग अवलंबले नाहीत. साम-दाम-दंड-भेद या तत्त्वांनुसार राज्यकारभार चालवला, हे सर्वश्रुत आहे. माझ्या वक्तव्याने कुणाच्याही भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो.”
दरम्यान, राहुल सोलापूरकर यांनी जरी माफी मागितली असली, तरी हा वाद शांत झालेला नाही. अनेक शिवप्रेमींनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच सोशल मीडियावरही त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका सुरूच आहे. त्यामुळेच सोलापूरकर यांच्यावर कारवाई होती की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.