औरंगाबाद – पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय पथकाने सोलापूर-धुळे नवीन हायवे वरील गोलवाडी शिवारातील एका फार्म हाऊस मधील अनाधिकृत बायोडिझेल अड्ड्यावर रविवारी छापा मारला. या कारवाईत पथकाने कंटेनर, ट्रक, बायोडिझेल स जवळपास 57 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केले असून, मुख्य सूत्रधार कलीम कुरेशी यांच्यासह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईच्या नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा राज्यस्तरीय दक्षता पथकातील उपनियंत्रक गणेश बेल्लाळे, संतोष शिंदे, सुशील साळसकर, संदीप आचरेकर, अमोल बुट्टे, महेश देशपांडे व औरंगाबाद पुरवठा विभागाचे निरीक्षक अनुराधा पाटील यांना गोलवाडी शिवारातील फार्महाऊसवर डिझेल सदृश्य बायोडिझेलची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून दक्षता विभागाने छापा मारला.
याप्रकरणी जागेचे मालक आवेज यार खान, मुख्य सूत्रधार कलीम कुरेशी, कामगार सय्यद नदीम, सलाम मोहम्मद चौक, गुफरान पठाण, तसेच ई-वेबिल व त्यानुसार आयातदार बायोडिझेल साठ्याचे विक्रेते, ट्रक व कंटेनरचे मालक व चालकाविरुद्ध जिल्हा पुरवठा तपासणी अधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या तक्रारीवरून एमायडीसीवाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.