हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची आर्थिक राजधानी मुंबईला खेटून असलेला मतदारसंघ म्हणजे रायगड…. चाणाक्ष मतदार, कुठल्याही लाटेवर स्वार न होणारा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. एकेकाळी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचा गड म्हणून रायगड मतदारसंघाची ओळख होती… शेकाप आणि काँग्रेसचा उमेदवार आलटून-पालटून निवडणून देणारा हा मतदारसंघ… मात्र हे गणित मोडित काढत २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार अनंत गिते या मतदारसंघातून निवडून आले, २०१४ ला झालेल्या पराभवाचा वचपा राष्ट्रवादीच्या तटकरेंनी २०१९ साली काढला, मोदी लाटेत ही इथल्या जनतेनं महायुतीच्या खासदाराला घरी बसवलं आणि सुनील तटकरेंना दिल्लीत पाठवलं…
रायगड लोकसभा मतदारसंघाला (Raigad Lok Sabha Election 2024) फार मोठा राजकीय इतिहास लाभला आहे… नव्यानं पुनर्रचना होण्याआधी कुलाबा लोकसभा मतदार संघ म्हणून हा ओळखला जात होता… सन १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या निधनानंतर राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात काँग्रेसने मोठं यश मिळवलं… पण कुलाबा मतदारसंघ त्यावेळी ही शेकाप सोबत राहिला… अगदी गेल्या २०१४ च्या निवडणुकीत संपूर्ण देशभरात मोदी लाट असतानाही शिवसेनेचे अनंत गिते जेमतेम दोन हजार मतांनी विजयी झाले होते आणि राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी तीन लाखांपेक्षा जास्त मतं घेतली होती तर शेकापच्या रमेश कदमांनी लाखांवर मतं घेत आपलं मूल्य दाखवून दिलं होतं… १९८९ ते १९९६ पर्यंत सलग तीन निवडणुकांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे निष्ठावान नेते… बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी शेकापचे ॲड. दत्ता पाटील यांचा पराभव केला… त्यानंतर दोनवेळा शेकापचे रामशेठ ठाकूर इथून निवडून आले… २००४ च्या निवडणुकीत बॅरिस्टर अंतुले पुन्हा विजयी झाले… रायगड मतदार संघाचा इतिहास पाहिला तर हा मतदारसंघ कधीही कोणत्याच लाटेवर स्वार झाला नाही…
२००८ साली रायगड लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली… यात रायगड जिल्ह्यातील चार तर रत्नागिरी जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला… रायगडमधील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, तर रत्नागिरीतील गुहागर आणि दापोली अशा एकूण सहा मतदारसंघांचा समावेश आहे. या सहापैकी अलिबाग, महाड आणि दापोली हे तीन विधानसभा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे, श्रीवर्धन मतदारसंघ अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे, पेण मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आणि गुहागरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनाची ताकद आहे… एकंदरीत पक्षीय बलाबलाचा विचार करता रायगडमध्ये सध्या सर्वच राजकीय पक्षांना स्कोप आहे…
आघाडीत बिघडी व्हायला आणि राजकारणातली समीकरणं बदलायला वेळ लागत नाही… मतांची बेरीज अन् वजाबाकी नेत्यांचं भविष्य ठरवत असते… रायगडच्या राजकारणात मुरलेल्या राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी ही आपल्या जवळची माणसं मतदारसंघात पेरलेली आहेत… स्वतः तटकरे (Sunil Tatkare) विद्यमान खासदार आहेत… त्यांच्या कन्या आदिती तटकरे या मतदार संघातून आमदार आणि राज्यात मंत्री देखील आहेत… तटकरेंच्या बाजूने असलेली महायुतीची ताकद, सत्तेच्या बाजूने असल्याचा मिळणारा फायदा आणि रायगडच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव या काही त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
तर महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता आहे. शिंदे गटामुळे शिवसेनेत अभीर फूट पडली असली तरी अनंत गीते यांनी उद्धव ठाकरेंची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या शरद पवार गटाकडे तटकरेंना टक्कर देणारा तोडीस तोड उमेदवार नाही, त्यामुळे हि जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाऊन अनंत गीते (Anant Geete) लोकसभेच्या रिंगणात उतरली आणि तटकरेंना आव्हान देतील. परंतुमहाविकास आघाडीला ही जागा सहजासहजी जिंकता येणार नाही… मतदारसंघात बदलेली राजकीय समीकरणं… इथल्या स्थानिकांचे प्रश्न, रखडलेली विकास कामं, रोजगारासाठी जमीन विकून मुंबईला जाणार तरुण… मतदारसंघात असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत… शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा असलेल्या या मतदारसंघात निवडणुकीचे गणित कोण साधणार… यंदा रायगड कोण सर करणार… हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे…