५० रेल्वे स्थानके, १५० रेल्वे गाड्यांचे व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे सोपवले जाणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । रेल्वे क्षेत्रातील खासगीकरणाला नीती आयोगाने गती दिली असून देशातील ५० रेल्वे स्थानके आणि १५० रेल्वे गाड्यांचे व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे सोपवले जाणार आहे. ही प्रक्रिया नीती आयोगाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सचिव स्तरावरील उच्चाधिकार समिती पार पाडेल, असा निर्णय रेल्वे मंडळाने गुरुवारी घेतला.

यामध्ये रेल्वे मंडळाचे अध्यक्ष, वित्त मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव, गृहबांधणी व नागरी विकास खात्याचे सचिव आणि रेल्वे मंत्रालयातील वित्तीय आयुक्त आदी समितीचे सदस्य असतील. यापूर्वीही रेल्वे मंडळाने रेल्वे स्थानकांच्या व्यवस्थापनाचे खासगीकरण करण्याची योजना आखली होती, मात्र ती वास्तवात उतरली नाही. अलीकडच्या काळात नीती आयोगाने सहा विमानतळांच्या व्यवस्थापनाचे खासगीकरण करण्याचे धोरण अमलात आणले होते.

दरम्यान देशातील ४०० स्थानकांच्या खासगीकरणाच्या माध्यमातून जागतिक दर्जाची बनवण्याचा रेल्वे मंडळाचा इरादा होता; पण आता पहिल्या टप्प्यात ५० रेल्वे  स्थानके आणि १५० गाड्यांचे व्यवस्थापन खासगी क्षेत्राकडे दिले जाईल आणि ही प्रक्रिया विशिष्ट वेळेत पूर्ण केली जाणार आहे. दिल्ली ते लखनऊ धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसची जबाबदारी रेल्वेने उपकंपनी ‘आयआरसीटीसी’कडे दिली आहे. तेजस एक्स्प्रेसच्या व्यवस्थापनाचे खासगीकरण ४ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. हे धोरण आता १५० रेल्वे गाड्यांबाबत केले जाणार आहे.

इतर काही बातम्या-