नवी दिल्ली । भारतीय रेल्वेने चालू आर्थिक वर्षात मालवाहतुकीच्या बाबतीत विक्रम केला आहे. खरेतर, चालू आर्थिक वर्षात (FY22) फेब्रुवारीपर्यंत रेल्वेच्या मालवाहतुकीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 17.6 कोटी टनांची विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात 28 फेब्रुवारीपर्यंत रेल्वेने एकूण 127.8 कोटी टन मालाची वाहतूक केली आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस रेल्वेने 14 कोटी टन वाहतूक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
फेब्रुवारीमध्ये 11.97 कोटी टन मालाची वाहतूक झाली
भारतीय रेल्वेने 2017-18 च्या 116.26 कोटी टनांच्या तुलनेत 2018-19 या आर्थिक वर्षात 122.53 कोटी टन वाहतूक केली आहे. चालू आर्थिक वर्षात, रेल्वेने जानेवारी 2022 मध्ये सर्वाधिक 12.91 कोटी टन वाहतूक केली. त्याच वेळी, फेब्रुवारीमध्ये, 11.97 कोटी टन मालाची वाहतूक झाली, तर वर्षभरापूर्वी याच महिन्यात ती 11.23 कोटी टन होती.
Highest ever annual incremental freight loading by IR. pic.twitter.com/OeW83l6MLk
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) March 1, 2022
आतापर्यंतची सर्वोच्च वार्षिक वाढ
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी एका ट्विटमध्ये सांगितले की, भारतीय रेल्वेने मालवाहतुकीत आतापर्यंतची सर्वाधिक वार्षिक वाढ नोंदवली आहे.
ईस्ट कोस्ट रेल्वे झोन हा या आर्थिक वर्षात 20 कोटी टनांचा टप्पा गाठणारा पहिला झोन बनला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या 11 महिन्यांत त्याने 20.05 कोटी टनांचा टप्पा ओलांडला आहे आणि एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीत 2.66 कोटी टनांची वाढ झाली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अजूनही कोळशाची सर्वाधिक वाहतूक केली जात आहे. त्यापाठोपाठ सिमेंट, अन्नधान्य, पेट्रोलियम आणि कंटेनरचा नंबर लागतो.