अमरावती प्रतिनिधी । देशभरासहित राज्यामध्ये देखील ख्रिसमस आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते. या काळात बाहेर गावी जाऊन पर्यटन करत उत्सव साजरा करण्याला बरेच जण प्राधान्य देतात. अमरावती जिल्ह्यातील तरुणाई देखील ह्याला अपवाद नाही. ह्यावर्षी सुद्धा सर्वांकडून ख्रिसमस, नववर्षाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात तयारी सुरु करण्यात आली आहे. मात्र बाहेरगावी जाऊन ख्रिसमस, नाताळ आणि नववर्षाचा जल्लोष साजरा करण्याच्या तरुणाईच्या नियोजनावर सध्या रेल्वे कडून पाणी फिरल्याचे दिसत आहे.
कारण रेल्वेचे बुकिंग फुल झाल्याची माहिती सध्या मिळत आहे. ख्रिसमस, नाताळ आणि नववर्षाच्या अनुषंगाने रेल्वे गाड्यांमध्ये २० डिसेंबरपासून ‘नो रूम’ झळकत आहे. अनेकांनी रेल्वेने प्रवास करण्याचे नियोजन आखले असले तरी दलालांनी आतापासून लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आरक्षण मिळविल्याची माहिती आहे. त्यामुळे बाहेर जाण्याच्या अनेकांच्या इच्छांवर पाणी फिरल्याचे दिसत आहे.
अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावर २० डिसेंबरपासून मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद मार्गे ये-जा करण्यासाठी रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण नसल्याने अनेकजण चिंतेत आहे, तर रेल्वे आरक्षण खिडक्यांवर तात्काळचे आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. परिणामी प्रवाशांना दलालांच्या आश्रयाला जावे लागणार असे आतापासून चित्र निर्माण झाले आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, चैन्नई, हावडा, अहमदाबाद आदी प्रमुख मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण नसल्याचे फलक झळकत आहे.