रेल्वेच्या एसी कोचमध्ये ड्युटी नसतानाही अनेक रेल्वे कर्मचारी प्रवास करत असल्याचं वारंवार समोर आलं आहे. यावर आता रेल्वे बोर्डाने कडक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. 28 फेब्रुवारीला रेल्वे बोर्डाचे डायरेक्टर (पॅसेंजर मार्केटिंग) विपुल सिंघल यांनी यासंदर्भात अधिकृत नोटिफिकेशन जारी केलं आहे. पूर्व रेल्वेसह सर्व झोनला या आदेशाची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर पूर्व रेल्वेचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (PCCM) उदय शंकर झा यांनी भागलपूरसह झोनमधील सर्व विभागांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
ड्युटी पास असलेल्यांनाच परवानगी
या नव्या आदेशानुसार, केवळ अधिकृत ड्युटी पास असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनाच एसी कोचमध्ये प्रवास करता येईल. कोणत्याही कर्मचाऱ्याने ड्युटी पासशिवाय एसी कोचमध्ये प्रवास केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.
तिकीट तपासणी मोहीम
तसेच, 1 जानेवारी ते 31 मार्चदरम्यान रेल्वे स्टेशन आणि गाड्यांमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेत बिनतिकीट प्रवासी, चुकीचे तिकीट असलेले प्रवासी आणि ड्युटी पासशिवाय एसीमध्ये बसलेले कर्मचारी यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
प्लॅटफॉर्म तिकीट तपासणीसाठी विशेष लक्ष
भागलपूरसह मालदा विभागातील सर्व प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट तपासणीही अधिक कठोर करण्यात येणार आहे. प्रवाशांनी तिकीट न घेता प्लॅटफॉर्मवर प्रवेश केल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो. केवळ 10 रुपयांच्या बचतीसाठी हजारोंचा दंड ओढवून घेऊ नका, असा इशाराही रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मालदा ते किऊलदरम्यान यासाठी विशेष टीम नेमण्यात आली आहे.
यूटीएस अॅपचा वाढता वापर
भागलपूरमध्ये सध्या 20,812 प्रवाशांनी आपल्या मोबाईलवर यूटीएस अॅप डाऊनलोड केले आहे, ज्याद्वारे आतापर्यंत 76,000 हून अधिक तिकिटे खरेदी केली गेली आहेत. त्यामुळे तिकीट खरेदीसाठी गर्दीत उभं राहण्याची गरज उरलेली नाही. यूटीएस अॅप आणि एटीव्हीएम मशीनद्वारे तिकीट काढणं अतिशय सोपं करण्यात आलं आहे.
होळीच्या गर्दीवरही नजर
होळीच्या सणानिमित्त रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी अपेक्षित असल्याने तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट तपासणी अधिक काटेकोर करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. योग्य नियोजन आणि कठोर अंमलबजावणीमुळे स्टेशनवरची बेकायदेशीर गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.