हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Rain In June 2025 । महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. यंदा मान्सूनने १५ दिवस आधीच धडक मारल्याने मे महिन्यातच पावसाळ्या सारखा अनुभव आला….देशाच्या संपूर्ण भागात मुसळधार पावसाने अक्षरशः हौदोस घातला. मे महिन्यातच इतका पाऊस असेल तर मग जून महिन्यात काय अवस्था होईल याचा विचार नक्कीच तुमच्या मनात आला असेल. होय, तुमची हि शंका काहीअंशी खरी सुद्धा आहे. कारण यावर्षी जूनमध्ये धुव्वाधार पाऊस पडणार असल्याचा भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा जून महिन्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच १०८% इतके असणार आहे. जूनमध्ये साधारणपणे १६०.६ मिमी पाऊस पडतो, परंतु यावेळी तो खूपच जास्त असण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांसाठी हि आनंदाची बातमी आहे.
जून महिन्यात साधारणपणे तीन ते चार दिवस उष्णतेची लाट येते, परंतु यावेळी उष्णतेच्या लाटेची शक्यता खूपच कमी आहे. या पावसाळ्यात मान्सूनच्या कोर झोनमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. खास करून मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा आणि आसपासच्या राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसेल. नैऋत्य मान्सून दरम्यान या प्रदेशात सर्वाधिक पाऊस पडतो आणि येथील शेती मोठ्या प्रमाणात मान्सूनवर अवलंबून असते. त्यामुळे जास्तीचा पाऊस (Rain In June 2025) हा शेतकऱ्यांना एकप्रकारे वरदान ठरणार आहे.
दक्षिण आणि मध्य भारतात पावसाचे प्रमाण अधिक- Rain In June 2025
संपूर्ण चार महिन्यांच्या हंगामात देशात १०६% इतका ‘सामान्यपेक्षा अधिक’ पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण आणि मध्य भारतात पावसाचे प्रमाण अधिक राहणार आहे. ईशान्य भारतात मात्र पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर-पश्चिम भारतात सामान्य पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्राबाबत सांगायचं झाल्यास, महाराष्ट्रात जून महिन्यात सरासरीपेक्षा १०५% अधिक पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खास करून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.