मंगळवरच्या पावसाने ‘स्मार्ट सिटीची’ दैना; मोठ्या प्रमाणावर नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आलेल्या गुलाब चक्रीवादळाचा औरंगाबाद शहराला चांगलाच तडाखा बसला आहे. मंगळवारी शहरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पावसाने ‘स्मार्ट सिटी’ औरंगाबाद ची चांगलीच दाणादाण उडवली होती. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आता महापालिकेने शहरातील नुकसानाचा अहवाल तयार केला आहे. यानुसार शहरात 29 ठिकाणी झाड कोसळले, 5 ठिकाणी भिंत कोसळली तर 8 वाहनांचा चुराडा झाला असून 122 ठिकाणी पाणी शिरले होते. मात्र मनपाकडून नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची कुठलीही तरतूद नाही. महसूल विभागाकडून पुढील कारवाई अपेक्षित असल्याचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने यांनी सांगितले.

मनपाच्या सर्व 9 वॉर्ड कार्यालयांनी आपापल्या भागात कोणते नुकसान झाले याचा अहवाल बुधवारी प्रशासनाला सादर केला. यामध्ये मनपाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मनपा मुख्यालयाजवळ 6 झाडे मंगळवारच्या पावसामुळे उन्मळून पडली. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या तारा, खांब वाकले होते. परिणामी मंगळवारी दिवसभर ‘स्मार्ट सिटी’ चे मनपा मुख्यालय अंधारात होते.

कुठे काय घडले ?
पंचकुआ कब्रस्तान ची भिंत कोसळली, औरंगपूऱ्यात तीन ठिकाणी झाडे कोसळली, उदय कॉलनीत नाल्याची व घराची भिंत पडली, दलालवाडी, सब्जीमंडी येथे घराची भिंत, सिडको एन -8 येथे 15 मीटर लांब भिंत पडली. तर 122 ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याची तक्रार मिळताच मनपाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याला वाट मोकळी करून दिली.

Leave a Comment