कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरणात 104.71 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 29 हजार 24 क्युसेस पाण्याची आवक होत आहे. काल गुरूवारी रात्री 11 वाजता धरणातून 27 हजार 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला होता. आता यामध्ये वाढ करून आज शुक्रवारी सकाळी 10 वाजता 41 हजार 958 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना व कृष्णा नदीपात्रातील पाणीपातळीत मोठी वाढ होणार आहे. तेव्हा नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी, असा इशारा कोयना धरण व्यवस्थापनाने दिला आहे. गेल्या तीन दिवसात चाैथ्यांदा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे.
मंगळवारी दि. 13 रोजी दुपारी 2 वाजता कोयना धरणाचे 6 वक्रदरवाजे 1 फुट 6 इंच उघडून 12 हजार 891 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला होता. परंतु पावसाचा जोर वाढल्याने धरण व्यवस्थापनाने 24 तासांच्या आत पुन्हा बुधवारी दि. 14 रोजी सकाळी 11 वाजता सहाही वक्र दरवाजे 3 फूट 6 इंचानी उचलून पाण्याचा विसर्ग वाढविला होता. गुरूवारी दि. 15 रोजी रात्री 11 धरणातून 27 हजार 400 पाण्याचा विसर्ग केला होता. आता आज शुक्रवारी सकाळी 10 वाजता 4 फूट 6 इंच वक्र दरवाजे उचलून 41 हजार 985 क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रातील कोयना क्षेत्रात 62, नवजा 61 तर महाबळेश्वर येथे 118 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कोयना धरणाचे बॅकवाॅटर असलेल्या महाबळेश्वर परिसरात पावसाची जोरदार बॅंटीग सुरू आहे. त्यामुळे कोयना, कृष्णा नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.