मुंबई । राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखेची आज घोषणा करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर २२ जूनला अधिवेशन घेणं शक्य नाही. त्यामुळं येत्या ३ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर ३ ऑगस्टला अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. आज महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही माहिती दिली. यावेळी उमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांची सुद्धा उपस्थिती होती.
काही दिवसांपूर्वीच कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळं झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेल्याची बाब स्पष्ट झाली. रायगड, रत्नागिरी भागात वादळाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसलेल्या नागरिकांसाठी काही आर्थिक तरतूदी करण्यात आल्याच्या महत्त्वाच्या घोषणा यावेळी सरकारतर्फे करण्यात आल्या. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. नुकसान भरपाई, पंचनामे सुरु आहेत. रायगडला तात्काळ मदत केली आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या निकषात बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
राज्य सरकारने एक विशेष बाब म्हणून प्रती कुटुंब ५ हजार रुपये कपड्यांसाठी आणि ५ हजार रुपये धान्यासाठी देण्याची तरतूद केली आहे. शिवाय वादळामुंळ पडझड झालेल्यांना प्रतिघर १५ हजार रुपये देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. याव्यतिरिक्त १० हजार रपये इतर नुकसानासाठी देण्यात येणार असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.
सद्याच्या घडीला NDRF आणि SDRF यांचे विहीत निकष बाजूला ठेवून निर्णय घ्यावे लागत आहेत, असं म्हणत वादळग्रस्तांना अधिकची मदत मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. घरांसाठी आर्थिक मदत देण्यासोबतच वादळग्रस्त भागांमध्ये वीजेचे खांबही उन्मळून पडल्यामुळं त्या भागातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित आहे. परिणामी या भागात प्रति रेशन कार्ड ५ लीटर रॉकेल मोफत देण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे.
याशिवाय मोफत धान्यवाटपही करण्यात येणार असल्याची माहिती शासनाच्या वतीनं अजित पवार यांनी दिली. वादळाचं हे संकट पुन्हा येऊ शतं, त्यामुळं ज्यांच्याकडे कौलारू घरे आहेत त्यांना स्लॅब ही घरे उभारता येतील का यावरही यावेळी चर्चा झाली. ज्या आधारे स्लॅब असलेलं हक्काचं पक्कं घर देण्यासाठी सर्व्हे करायला सांगितलं गेल्याची माहिती सरकारडून मिळाली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”