कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील कोयना धरणाची पाणी क्षमता 105 टीएमसी साठा असून आज 84 टीएमसी पाणीसाठा होता. धरण व्यवस्थापनाने पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज दि. 23 शुक्रवारी सकाळी 8 वाजता 10 हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे, तर पावसाचा जोर असल्याने 10 वाजता हा विसर्ग वाढवून 25 हजार पर्यंत करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले आहे.
सातारा जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला होता. दोन दिवसात झालेल्या धुवाधार पावसामुळे कोयना- कृष्णा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कराड शहर व पाटण तालुक्यातील अनेक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे. कोयना आणि कृष्णा या दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेल्याने पूरस्थिती गंभीर होण्याचे दिसत आहे.