हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते चक्रीवादळाने नुकसान झाल्यामुळे मदतीची याचना करणाऱ्या 90 वर्षीय शिक्षिका सुमन रणदिवे यांच्याशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोन वरून संवाद साधला. सुमन रणदिवे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या शिक्षिका होत्या. आधी पतीचं छत्र हरवलं, नंतर मुलालाही काळाने हिरावलं. सध्या त्या वसईतील सत्पाळा गावातील “न्यू लाईफ फाऊंडेशन” या वृद्धाश्रमात वास्तव्य करत आहेत. या वृद्धाश्रमाला तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला.
राज ठाकरेंना फोनवरून नमस्कार करताच सुमन यांनी त्यांच्याकडे आपलं गाऱ्हाणं माडलं. ‘वादळामुळे खूप मोठं नुकसान झालंय. जास्तीत जास्त मदत कर,’ अशी विनंती सुमन रणदिवे यांनी केली. त्यावर मी अविनाश जाधव यांना सांगितलं आहे. ते नक्की मदत करतील. तुम्ही काळजी करू नका, असं आश्वासन राज यांनी दिलं. यावेळी कुंदा कशी आहे, अशी विचारणा रणदिवेंनी केली. त्यावर आई बरी आहे असं उत्तर राज यांनी दिलं.
मध्यंतरी तू इथे आला होतास. पण आपली भेट झाली नाही. एकदा मला भेटायला ये ना, असं म्हणत रणदिवेंनी राज यांच्याकडे भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर लॉकडाऊन संपू दे. नक्की भेटायला येतो, असा शब्द राज यांनी रणदिवे यांना दिला.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.




