हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Raj Thackeray Meet Sanjay Raut । मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. मागील महिनाभरापासून संजय राऊत हे एका गंभीर आजाराने त्रस्त आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे थेट त्यांच्या घरी दाखल झाले आहेत. यापूर्वी उद्धव ठाकरेंनीही संजय राऊतांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. राज ठाकरे जवळपास 20 वर्षांनी आमच्या घरी आले अशी प्रतिक्रिया यावेळी संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
राज ठाकरे- संजय राऊत यांचे जिव्हाळ्याचे संबंध Raj Thackeray Meet Sanjay Raut-
खरं तर राज ठाकरे जेव्हा बाळासाहेबांसोबत शिवसेनेत काम करत होते तेव्हा त्यांचे आणि संजय राऊत यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. पुढे राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केल्यानंतर राऊत आणि राज यांच्यात थोडंसं वितुष्ट आल. मधल्या काळात तर राज ठाकरे आणि संजय राऊत यांनी एकमेकांवर अगदी सडकुन टीकाही केली होती. मात्र यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंचे मनोमिलन झालं आणि राज ठाकरे – संजय राऊत यांची मैत्री पुन्हा एकदा उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळाली. एवढेच नव्हे तर दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी संजय राऊत यांनीच मध्यस्थी केल्याच्या चर्चा आजही राजकीय वर्तुळात सुरू असतात. आता तर २० वर्षांनी राज ठाकरे संजय राऊत यांच्या घरी गेले आहेत. (Raj Thackeray Meet Sanjay Raut)
राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात अजूनही चर्चा सुरु आहे. ज्या पद्धतीचा तुमचा आजार आहे, ते पहाता आता तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. लोकांमध्ये न मिसळता आणखी दीड महिने आराम करा आणि त्यानंतर मग तुम्ही जनतेमध्ये या, असा सल्ला राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिला आहे. राज हे तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी राऊतांच्या घरी गेले असले तरी त्यांच्यात आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण सध्या मनसे आणि ठाकरेंची शिवसेना युतीच्या अंतिम टप्प्यात आली आहे. दोन्ही पक्ष कोणत्याही परिस्थिती एकत्रितपणे निवडणूक लढवणार हे निश्चित मानले जात असून जागावाटपावर दोन्ही बाजूंकडून चर्चा सुरु आहेत. या सर्व चर्चेत संजय राऊत यांची भूमिका अतिशय महत्वाची असणार हे नक्की, कारण संजय राऊत हेच मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीचा धागा आहेत.
काल फडणवीस- राऊत भेट
दरम्यान, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात रात्री उशीरा भेट झाली. संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाचा विवाहसोहळा मंगळवारी मुंबईत होता. या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार उपस्थित होते. खरं तर संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांचे राजकीय शत्रू म्हणून ओळखले जातात. परंतु राऊतांच्या तब्बेतीची विचारपूस करत फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पुन्हा एकदा दर्शन घालून दिले.




