हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील टोलनाके आणि मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे पक्ष आक्रमक झाल्याचा दिसत आहे. या पार्श्वभूमीवरच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. आज वर्षा निवासस्थानावर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत टोलनाके आणि मराठी पाट्यांबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय केंद्रस्थानी राहिला.
आज राज ठाकरे अचानक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जाणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. तसेच या भेटी मागील नेमके कारण काय असेल याबाबत देखील तर्कवितर्क लावण्यात येत होते. अखेर, टोलनाके आणि मराठी पाट्यांसंदर्भात या दोन प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आता समोर आली आहे. या चर्चेदरम्यान राज ठाकरे यांच्याबरोबर मनसे आमदार राजू पाटील उपस्थित होते.
https://twitter.com/mieknathshinde/status/1730832735328178248?t=104BirPyjqdt_bnqqfVDRw&s=19
मुख्य म्हणजे, मुख्यमंत्र्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी राज्यात दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावरून आता राज ठाकरे टोल नाक्याच्या मुद्द्याप्रमाणे मराठी पाट्यांचा मुद्दा देखील उचलून धरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, यापूर्वी देखील राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी मुंबईतील टोलनाके आणि एन्ट्री पॉईंट्ससंदर्भात काही प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारले होते. त्यावेळी शिंदेंकडून राज ठाकरेंना अनेक आश्वासने देण्यात आली होती.