हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात धुव्वाधार पावसामुळे अतिवृष्टी आली असून अनेक ठिकाणी महापुराचा धोका निर्माण झाला आहे. राज्यात काही ठिकाणी दरडी कोसळल्या असून अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहून लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे राज ठाकरे यांच पत्र-
माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो,
महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण पूर-परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या अवघड परिस्थितीत मी सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्यांना जितकं जमेल तितकी मदत त्यांनी पूरग्रस्तांना करावी असे आवाहन करतो.
आत्ता लोकांचा जीव महत्वाचा आहे आणि नंतर जसजसा पूर ओसरेल तसा रोगराईचा धोकाही वाढू शकेल. तुम्ही त्यात लक्ष घालून अत्यंत तातडीनं योग्य ती मदत तिथे पोचेल असं पहावं. काम करताना अर्थातच स्वत:ची काळजीही घ्यावी. महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये. असे पत्र राज ठाकरे यांनी लिहिलं.