सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा शहराजवळ असलेल्या अंजिक्यतारा किल्ल्याला पुरातन इतिहास आहे. परंतु काळाच्या ओघात त्याच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. हा किल्ला पुरातत्व विभागाच्या राज्य संरक्षित किल्ल्यामध्ये येत नसल्यामुळे दुर्लक्षित झाला आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन होत नाही. हा किल्ला राज्यसंरक्षित किल्ला म्हणून घोषित करावा यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत नगरविकास विभागाची बैठक घेणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
शाहुनगरी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा छ. वृषालीराजे भोसले यांनी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यांना निवेदन दिले होते. त्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले की, सातारा ही ऐतिहासिक वारसा लाभलेली नगरी. मराठयांची चौथी राजधानी असलेल्या अंजिक्यतारा किल्ला शिलाहार वंशीय भोज राजा (दुसरा) याने इ.स. 1190 मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स. 1580 मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चाँदबिबि या किल्यावर कैदेत होत्या.
श्री. छ. शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या अशा या ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या अंजिक्यतारा किल्ल्याचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु हा किल्ला पुरातत्व विभागाच्या राज्य संरक्षित किल्ल्यामध्ये येत नसल्यामुळे दुर्लक्षित झाला आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन होत नाही, तरी हा किल्ला राज्यसंरक्षित स्मारक किल्ला म्हणून जाहीर करण्याबाबत कार्यवाही करावी.
त्याकरिता लागणारे सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत. अशा प्रकारचे निवेदन डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना दिले होते. त्याची दखल घेतली. त्याप्रमाणे याप्रश्नी अधिका-यांची संयुक्त बैठक लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमवेत घेणार असल्याची माहिती त्यांनी दूरध्वनीव्दारे दिली, असल्याचे वृषालीराजे भोसले यांनी सांगितले.