हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर मोठा राडा (Rajkot Fort Dispute) पाहायला मिळाला. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि नारायण राणे (Narayan Rane) हे किल्ल्याची आणि छत्रपतींच्या पडललेया पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आले होते, मात्र दोन्ही नेते समोरासमोर येताच कार्यकर्त्यांनी मोठा राडा केला. दोन्ही पक्षांचे समर्थक आपापसांत भिडले, त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं. राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. निलेश राणे हे सुद्धा पोलिसांशी हुज्जत घालताना दिसले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळल्यानंतर संपूर्ण राज्यातील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकोट किल्ल्यावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार,आदित्य ठाकरे, विनायक राऊत, वैभव नाईक, जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेतेमंडळी किल्ल्यावर पोचले. मात्र नेमकं त्याचवेळी महायुतीचे नेते, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे देखील राजकोट किल्ल्यावर पाहाणी करण्यासाठी दाखल झाले. दोन्ही नेते एकमेकांसमोर येताच समर्थक एकमेकांसोबत भिडले. तसेच दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यानंतर नारायण राणे आणि निलेश राणे हे देखील चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राणे समर्थक आणि पोलिसांमध्येही बाचाबाची सुद्धा झाली. आम्ही आमचा वेळ पोलिसांना दिला होता. त्यानंतरही हे कसं काय घडलं? हे बाहेरुन येऊन अंगावर येत आहेत. हे बाहेरुन येऊन अंगावर येणार का? त्यांना गपचूप निघायला सांगा. आमच्या एकाही कार्यकर्त्याला हात लावायचा नाही. असं निलेश राणे यांनी पोलिसाना सांगितलं तर त्यांना आमच्या अंगावर यायला परवानगी द्या, मी एकेएकाला बघतो. घरात रात्रभर ठेचून एकेकाला मारुन टाकेन. कोणालाही सोडणार नाही असा दम नारायण राणे यांनी दिला.
या एकूण सर्व राड्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, हे दुर्दैवी आहे. त्यांची बुद्धी तेवढीच आहे. बालबुद्धी तेवढी राहते, उंचीप्रमाणे बुद्धी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्यामध्ये आपण तरी राजकारण करायचं नाही. म्हणूनच मी इथे सगळ्यांना अडवून धरलं आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच ज्या व्यक्तीला छत्रपतींचा पुतळा बनवण्यासाठी कंत्राट दिले तो कुठे फरार झाला? , त्याला पळून जायला मदत केली का? जसं भाजपवाल्यांनी रेवन्नाला पळून जायला मदत केली होती. तशीच यालाही केली का? अशी एकामागून एक प्रश्नाची सरबत्ती आदित्य ठाकरेंनी केली तसेच जे मंत्री आहेत, पीड्ब्यूडीएफचे त्यांच्यावर यासाठी एफआयआर झालंय का? असा सवालही ठाकरेंनी केला.