दुष्काळग्रस्तांचे प्रश्न सोडवा, अन्यथा रस्त्यावर उतरु ; राजू शेट्टींचा राज्य सरकारला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता निर्माण झाली आहे. राज्यातील मंत्र्यांकडून दुष्काळी दौऱ्याचा फार्स सुरु आहे. केवळ मंत्र्यांचे दौरे नकोत, दुष्काळग्रस्तांचे प्रश्न सोडवा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला दिला. आचारसंहितेचे कारण पुढे करून शासन ढिम्म झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सांगली येथे एका कार्यक्रमासाठी आले असता राजू शेट्टी यांनी दुष्काळी परिस्थितीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
२३ एप्रिल रोजी सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. आयोगाने सुद्धा दुष्काळी उपाय योजनांसाठी आचारसंहितेची कसलीही अडचण येणार नाही, हे स्पष्ट केले आहे. असे असताना कार्यक्षमपणे राज्यातील दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते, पण तसे होताना दिसत नाही, असा आरोप सरकारवर शेट्टी यांनी केला आहे. तसेच अवघा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघत आहे. जनावरं चारा आणि पाण्याअभावी तडफडून मरत असताना चारा छावण्यांबाबत अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या. छावण्यांसाठी जाचक अटी लादण्यात आल्याने त्या सुरु करण्यात प्रशासनाला अडथळे येत असल्याचे स्पष्ट झाले असे शेट्टी म्हणाले.

दुष्काळी भागातील शेतक़ऱ्यांची अवस्था ही भीक नको, पण कुत्रं आवर अशी झाली आहे. सरकारी यंत्रणाही आचारसंहितेच्या नावाखाली सुस्त असून दुष्काळाकडे दुर्लक्ष करत आहे. राज्य सरकारच्या कार्यक्षमतेमुळे आज दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे. राज्यातील दुष्काळी भागात तातडीने उपाय योजना करण्याच्या मागणीसाठी विभागीय आयुक्तांना भेटणार असल्याचेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment