माँ जी, तुम्हारा बेटा देश का किसान नेता है !! राजू शेट्टींनी सांगितली प्रणव मुखर्जी यांची आठवण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ५ वर्षे आमदार १० वर्षे खासदार पदावर असे १५ वर्षे मला मुंबईतील व दिल्लीतील सभाग्रहाचे काम करण्याचे भाग्य मिळाले. चळवळीच्या व्याप्तीमुळे मी माझ्या आईला त्या काळात ना मुंबई दाखविली ना दिल्ली. आईने माझ्याकडे इच्छा व्यक्त केली कि मला दिल्ली बघायची आहे या वाक्यानंतर मी थोडा विचलीत झालो कारण गेली ३० वर्षे या चळवळीत माझ्या पाठीमागे माझ्या कुंटूबाच्या पाठीशी ठामपणे राहणारी आई पहिल्यांदा काहीतरी आपल्याकडे मागणी करत आहे. व आईच्या त्या इच्छेनंतर मी त्याच आठवड्यात पहिल्यांदा विमानाने दिल्लीला घेऊन गेलो. यावेळी लोकसभेचे सभाग्रह फिरल्यानंतर आईने मला प्रश्न केला कि या सभाग्रहात राष्ट्रपती कुठे असतात त्यांना मला भेटायचे आहे. मी तिला सांगितले की राष्ट्रपती हे राष्ट्रपती भवनात बसतात. मी त्याच दिवशी तत्कालीन राष्ट्रपती प्रणवदा यांना माझी ८६ वर्षाची आई आपली भेट घेणार असल्याचे विनंती पत्र पाठविले. सायंकाळी ८ वाजता मला राष्ट्रपती भवनातून दुस-याच दिवशी दुपारी १ वाजता भेटण्याची वेळ निश्चित केले असल्याचा निरोप मिळाला. मी आईंना घेऊन थेट राष्ट्रपती भवन गाठले व माझ्या आईला प्रणवदा यांची ओळख करून दिली. प्रणव दादांनी अत्यंत विनम्रपणे आमचे स्वागत करून संपुर्ण कुटूंबाची आस्थेवाईकपणे चौकशी केली. जवळपास अर्धा तासाच्या या भेटीत माझ्या आईने भारताच्या प्रथम नागरीकांना निरखून पाहिले. या भेटीनंतर बाहेर पडत असताना प्रणवदा यांनी माझ्या आईला विनम्रपणे नमस्कार करून “माॅं जी तुम्हारा बेटा देश का किसान नेता है ! हे वाक्य जेंव्हा त्यांच्या ओठांतून ऐकले तेंव्हा शिवारातून संसदेत पाठविलेल्या या आईला माझ पोरग यशस्वी पुत्र असल्याचा तिला सार्थ अभिमान वाटला.

२००९ ते २०१४ या काळात मी खासदार असताना ते वित्त मंत्री होते. त्याकाळी अनेक प्रश्नासाठी त्यांना भेटण्याचा योग आला. अत्यंत शांतपणे एखाद्या प्रश्नाची माहिती घेणे व त्याबाबत उपाययोजना करणे यामध्ये प्रणवदा वस्ताद होते.

सभाग्रहाचा सन्मान करत सर्व घटकांना न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. इचलकरंजी येथील वस्त्रोद्योग प्रश्नाबाबत बैठक लावण्याची मी पत्रव्यवहाराद्वारे मागणी केली. त्यांना दोनच आठवड्यात त्या मिटींगचे नियोजन करून सर्व अधिकारी यांचेसह त्या क्षेत्रातील मिटींग लावून टफ योजनेसाठी त्यावेळी विशेष तरतूद केली. प्रणवदा पक्षविरहीत काम करत असताना अनेकदा त्यांनी वडीलकीच्या नात्याने चांगले राजकीय सल्लेही दिले. अशा या देशाच्या राजकारणातील शांत ,सयंमी, अजातशत्रू व्यक्तीमत्व, प्रचलित राजकारणातील भीष्माचार्य भारताचे माजी राष्ट्रपती प्रणवदा मुखर्जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’