हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर काँग्रेस पक्षाला (Congress Party) एक मोठा धक्का बसला आहे. आज काँग्रेसचे प्रभाग राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Ekanth Shinde) उपस्थितीत काँग्रेसची साथ सोडत राजू वाघमारे यांनी शिवबंधन हाती बांधले आहे. राजू वाघमारे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे लोकसभा निवडणूकीत काँग्रेसला याचा मोठा फटका बसला शक्यता वर्तवली जात आहे.
आज काँग्रेसची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करताना राजू वाघमारे म्हणाले की, “काँग्रेस पक्षाची सध्या होत असलेली फरफट आणि पक्षातील काही नेत्यांच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करतो का असा प्रश्न पडला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रक्त सांडत सांगावं लागतंय की सीट आमची आहे. भिंवडीची सीट थेट शरद पवारांनी जाहीर केली. याचा परिणाम माझ्या सारख्या कार्यकर्त्यांवर झाला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना भविष्य कळत नाही का? त्यांना दिशा दाखवण्यासाठी आज मी पक्षप्रवेश करत आहे”
त्याचबरोबर, “मी माझे भाग्य समजतो की, मुख्यमंत्र्यांनी मला संधी दिली. छत्रपतींचं स्वप्न साकार करण्यासाठी मी एकनाथ शिंदेंसोबत आहे. काँग्रेस पक्ष, उबाठातील हजारो कार्यकर्ते आहेत, ज्यांना नेता नाही. हे सर्व एसीमधले नेते आहेत, शिंदे तळागळातले नेते आहेत. मागील दोन वर्षांत मुख्यमंत्र्यांनी मोठी कामगिरी केली आहे. ते कॉमन मॅन सीएम आहेत.” अशा शब्दात राजू वाघमारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले. दरम्यान, राजू वाघमारे हे दीर्घकाळापासून काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून काम पाहत होते. आता त्यांनी थेट शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे याचा काँग्रेसला धक्का बसला आहे.