पुणे । मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) देण्यात येणारा आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे, त्यामुळे मराठा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या (SEBC) आरक्षणाला धोका झाल्यास सरकार जबाबदार राहील, असा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी गुरुवारी दिला. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध करून राज्य सरकारने आरक्षण दिले होते. त्याला सर्वोच्च न्यायालयाने वर्षभराची स्थगिती दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठा समाजाला EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे १० टक्के आरक्षण सर्वसाधारण गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे, मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. EWS आरक्षणाला माझा वैयक्तिक विरोध नाही, पण ते घेतल्यास SEBCचे आरक्षण घेता येणार नाही असे जाणकार वकील सांगत आहेत. मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २५ जानेवारीला अंतिम सुनावणी होणार आहे, त्यावेळी या मुद्द्यावरून काही घोटाळा झाल्यास सरकार जबाबदार राहील, असेही ते म्हणाले.
नाहीतर ‘सारथी’ गुंडाळून टाका
राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक असलेल्या शरद पवार यांनी सारथी संस्था वाचवण्याबाबत हस्तक्षेप केला पाहिजे. अन्यथा सारथी संस्था एकदाची गुंडाळून बंद करून टाका, अशी उद्विग्नताही संभाजीराजेंनी व्यक्त केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’