नागपूर । मराठा आरक्षणावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. ‘तुम्ही ओबीसीत का येत नाही?’, अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केल्याचा दावा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता. या दाव्यावर आता वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत संभाजीराजेंचा दावा फेटाळला आहे. ”संभाजीराजे अर्धवट बोलले, पूर्ण बोलले नाहीत, यामुळे मला खेद आहे,” असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ओबीसीमध्ये यायचं असेल तर 27 टक्के आरक्षणामध्ये तुमचं 27 टक्के आरक्षण जोडा आणि वेगळा प्रवर्ग करा, असं संभाजीराजेंना म्हटल्याचा प्रतिदावा वडेट्टीवार यांनी केला आहे. तसंच ओबीसीसाठी जी लढाई मी लढत आहेत, त्याची धार बोथट करण्याची ही खेळी असावी, अशी शंकाही वडट्टेवारी यांनी बोलून दाखवली.
वडेट्टीवार म्हणाले की, “माझ्या वक्तव्याचा अर्थ संभाजीराजेंनी काय घेतला किंवा त्यांची काय गफलत झाली, हे माहित नाही. माझं वक्तव्य, माझं बोलणं स्पष्ट होतं. आम्ही मराठा समाजातील गरीब मुलांच्या नुकसानीच्या आड येत नाही आणि येण्याचा विषयच नाही, अंस आम्ही वारंवार सांगितलं असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. महाराष्ट्राच्या छत्रपती शिवरायांच्या दिमतीला बहुजन समाजच होता.राजांची भूमिका एककल्ली असू नये. ते छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहेत. ज्या शाहू महाराजांनी शोषितांसाठी, गरिबांसाठी आरक्षणाची तजवीज केली, त्यांच्या वंशज केवळ मराठा समाजासंदर्भात वक्तव्य करत आहे, असा मेसेज जाऊ नये हे राज्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही असं वडेट्टीवार यांनी म्हटलं. आमची भूमिका ही मराठ्यांच्या, मराठा समाजाच्याविरोधात आहे, असं चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला. त्यावर माझी प्रतिक्रिया अशी होती की, आम्हाला आमच्या आरक्षणाला धक्का न पोहोचता तुम्हाला ओबीसीत यायचं असेल तर वेगळं मागा, त्याचा संवर्ग वेगळा करा, असं स्पष्टपणे मी महाराजांशी बोललो. पण महाराज अर्धवट बोलले, पूर्ण बोलले नाहीत त्यामुळे मला खेद वाटतोय.” अशी भावना वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
तर ‘ओबीसीच्या 27 टक्के आरक्षणामध्ये तुमचं 27 टक्के आरक्षण जोडा’
वडेट्टीवार म्हणाले की, “पाच-सहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत संभाजीराजे माझ्या शेजारी बसले होते. ते म्हणाले तुम्ही ओबीसी नेते आहेत. पण तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध का करता? यावर आम्ही कुठे विरोध करतोय, आम्ही विरोध करायचा विषयच नाही, असं उत्तर दिलं. तुम्हाला ओबीसीत यायचं असेल तर तुम्ही आताचा आमचा 27 टक्के कोटा आहे, त्यात तुम्ही 12 टक्के जोडून घ्या आणि तुमचा वेगळा संवर्ग करुन घ्या. 27 टक्के कोट्यामध्ये ओबीसीसाठी 19 टक्के, धनगर, वंजारी, भटक्या जाती, विमुक्त जमाती यांच्या हे सगळे मिळून आठ टक्क्यांचा समावेश आहे. या 27 टक्क्यांमध्ये 12 टक्के जोडल्यावर 39 टक्के होतात. यात एससी-एसटीचं आरक्षण मिळवलं तर ते 50 टक्क्यांच्या वर जातं. पुन्हा तोच विषय आडवा आला. आमच्या वाट्याचं तुम्ही घेऊ नका. हा समाज अत्यंत गरीब आहे. अनेकांना राहायला घर नाही, शिक्षणाचं प्रमाण 7 टक्के आहे. त्यात तुम्ही म्हणता आमच्यावर अन्याय का करता, आम्ही अन्याय करत नाही. तुम्हाला ओबीसीमध्ये प्रवेश हवा असेल तर 27 टक्क्यांमध्ये 12 टक्के जोडा, हे मी महाराजांशी चर्चा करताना बोललो होतो.”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”