विचार तर कराल । मृदगंधा दीक्षित
Ram Mandir | एक सश्रद्ध हिंदू म्हणून आणि स्वतंत्र भारताची नागरिक म्हणून ‘बाबरी मस्चीद पाडणं’ आणि ‘आज राम मंदिरामधला (Ram Mandir) सरकारचा सहभाग’ हे दोन्ही मला पटलेलं नाही. सामान्य माणसं आज जो उत्सव साजरा करत आहेत तो ठीक आहे. माणसांना उत्सवांची गरज आणि हौस असते. पण सरकारच्या जबाबदाऱ्या याहून मोठ्या असतात. निधर्मी राष्ट्रात अशा धार्मिक बाबतीत तटस्थ सरकार हवं.
मोघल आणि इंग्रजांनी या न त्या मार्गाने धर्मांतरं घडवून आणली हा आपला इतिहास आहे. हिंदूंची मंदिरं पाडली गेली हा देखील आपला इतिहास आहे. त्यातून निर्माण झालेली हिंदूंच्या मनातली असुरक्षितता देखील काही अंशी स्वाभाविक आहे. पण सुरक्षितता निर्माण करायची असेल तर सरकारने देवळं बांधत सुटणं हा योग्य उपाय नाही. विकासच आपल्याला सुरक्षा देऊ शकतो. ‘लोकशाही, निधर्मी आणि विकसनशील सरकार’, याला दुसरा पर्याय नाही. धार्मिक सरकार हा तर नाहीच नाही.
कोणी म्हणेल या मंदिर बांधणी (Ram Mandir) आणि त्यानंतर येणाऱ्या पर्यटनातून रोजगार निर्माण होतील. परंतु हा विकासाचा योग्य मार्ग नव्हे. शिक्षण, समानता, निसर्ग संवर्धन, स्वच्छता, प्राथमिक सुविधा-सुखसोयी शेवटच्या माणसापर्यंत पोचणं आणि रोजगारासाठी गाव सोडावं न लागणं इ. हा विकास आहे. मुद्दा मंदिर बांधलं जातंय, फक्त हा नाहीय. सरकारचा आणि शिक्षित नागरिकांचा फोकस हललाय हा मुद्दा आहे.
आपला देश अविकसित आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार पासून पाणी, रस्ते असे अगदी प्राथमिक मुद्दे आपण अजून सोडवू शकलेलो नाही. जातीव्यवस्था, दोन जमातींमधले लढे अजून सुरु आहेत. अशावेळी सरकारचा फोकस काय असायला हवा? अत्यंत प्रामाणिकपणे सांगायचं तर माझ्यासारख्या सवर्ण आणि पुरेशी चांगली आर्थिक परिस्थिती असलेल्या व्यक्तीला हे प्रश्न भेडसावत नाहीत. मला याची थेट झळ पोचत नाही. पण मला विकसित देशात रहायचं आहे हा माझा अगदी स्वार्थी विचार घेतला तरी सरकारची ही कामाची दिशा माझ्या फायद्याची नाही. माझ्या सोबतच्या सर्वांना शिक्षण, समान वागणूक, प्राथमिक सोयी सुविधा, सुरक्षितता इत्यादी गोष्टी मिळत नाहीत तोपर्यंत मला सुरक्षित कसं वाटेल?
मोघलांनी, इंग्रजांनी मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या तेव्हा ते राज्यकर्ते प्रजेला खिचगणतीत धरत नव्हते. आज लोकशाही राष्ट्र आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी हे करणं अधर्म आहे. देवाच्या ज्या कथा मी ऐकल्या, वाचल्या. संत मंडळींचं सांगणं ऐकत मोठं होताना धर्माची व्याख्या जी मला समजली ती अशी होती, “आपली आपली त्या त्या क्षणाची भूमिका ओळखून त्या भूमिकेचं कर्तव्य पार पाडणे” हा धर्म आहे. सरकारची भूमिका ही देशाचा विकास असली पाहिजे. आर्थिक, शैक्षणिक सर्व्हे जे अलीकडे येत आहेत, त्यावरून आपल्याला अजून बरंच काम करणं आवश्यक आहे. या सुविधा न पोचलेला हिंदू देखील या उत्सवात सहभागी आहेच की, असं कुणी म्हणेल. एक उदाहरण सांगते, तथाकथित खालच्या जातीत जन्माला आलेली माझी मैत्रीण. तिची आई मला स्वतःच्या हातचं खायला देत नसे. ती म्हणे तू ब्राह्मण आहेस, माझ्या हातचं खाऊन तुझा धर्म बुडेल. ती आमच्या घरी खुर्चीवर बसायला देखील तयार होत नसे. तिला त्यात अयोग्य असं काही वाटत नव्हतं पण मला, माझ्या आईला तर कळत होतं ना की हे बरोबर नाही. तसं ज्याला कळतं आहे त्यानं बोललं पाहिजे. आणि हे बोलणं हाच धर्म नव्हे काय? धर्म म्हणजे कर्तव्यच नव्हे काय?
मंदिर मस्चीद यांच्या नादी जास्त न लागता आपल्या विकासाकडे लक्ष देऊ- Ram Mandir
रामाला धोबी देखील प्रश्न विचारू शकत होता. आज राम भक्त म्हणवणाऱ्या पंतप्रधानाला कोण प्रश्न विचारू शकतंय? (Who Ask Question To PM Modi) “बाबरी मस्चीद पाडली ते चूक होतं, आज कोर्टाने मंदिर बांधण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ते मंदिर बांधणाऱ्यांचं अभिनंदन पण आपण आता मंदिर मस्चीद यांच्या नादी जास्त न लागता आपल्या विकासाकडे लक्ष देऊ” अशा अर्थाचं बोलणारं सरकार किमान स्वातंत्र्याच्या पंचहत्तरीनंतर तरी आपल्याला मिळायला हवं होतं.
मोघल, इंग्रज काय आणि जुनी सरकारं काय यांच्या चुका फक्त काढत बसून विकास होणार नाही. मंदिर बांधणं आणि त्याचा सामान्य माणसांनी चालवलेला उत्सव हा गौण प्रश्न आहे. माझी अस्वस्थता सरकारच्या त्यातील सहभागाविषयी आहे. धर्माधिष्ठित पाकिस्तानचं काय झालं आपण पाहतोय. म्हणजे आपला आता पाकिस्तान होईल किंवा सगळं संपलच आहे, अशी निराशावादी भूमिका माझी नाही. धर्माचे, सत्तापिपासू माणसांचे अनेक हल्ले आपण पचवले आहेत. आपण म्हणजे अखिल मानवजातीने. मला ही अशी भूमिका घेण्याचं स्वातंत्र्य आज आहे. आणि या स्वातंत्र्याचा इतिहास मी विसरलेले नाही. लोकशाही साध्य होण्याकडे आपला प्रवास धीम्या गतीने का होईना होत आहे. हळूहळू असेल पण आपण पुढेच जात आहोत असं मला वाटतं. फक्त ते पुढं जाणं सहज आणि स्वाभाविक नसतं. त्यासाठी विवेकी माणसांनी भूमिका घ्यावी लागते, संघर्ष करावा लागतो.
आपल्या धर्माचा देखील इतिहास संपूर्ण सोनेरी नाही. याच धर्माने माउलींना वाळीत टाकलं होतं, तुकारामाला त्याची गाथा बुडवायला लावली होती, पांडुरंगाच्या मंदिरात इतर जातींना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींना उपोषण करावं लागलं होतं आणि आंबेडकरांना बौद्ध धर्म स्वीकारावा लागला होता. दुर्दैवाने ही यादी फार मोठी आहे. आजही वाढत आहे. सुधारणेला वाव हिंदू धर्मात देखील आहे.
विकासाची -एकतेची – समानतेची आणि न्यायाची हमी ही लोकशाही सरकारची जबाबदारी आहे. हिंदूंना सुरक्षित वाटण्यासाठी मंदिरं बांधणं ही सरकारची जबाबदारी नाही. उद्या हिंदू राष्ट्र झालं असं आपण एका क्षणासाठी गृहीत धरलं तरी आपल्या जाती व्यवस्थेचं काय? स्त्रियांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीचं काय? आर्थिक विषमतेचं काय? समाज सुधारकांनी, संतांनी धर्मात सुधारणा घडवून आणणं आणि सरकारने फक्त आणि फक्त देशाच्या सर्वांगीण विकासावर लक्ष्य केंद्रित करणं याला पर्याय नाही.
सश्रद्ध हिंदू म्हणून देखील श्रद्धेची विविधता मला अधिक सुरक्षित वाटते. देव सर्वज्ञानी आहे. हर ठिकाणी मौजूद आहे. त्यामुळे एकट्यात वा गर्दीत तो मला पाहतो आहे. अध्यात्म मला कर्तव्य टाळायला, कुणाचाही द्वेष करायला परवानगी देत नाही. निधर्मी राहणं हे माझ्या सरकारचं कर्तव्य आहे. स्वतःचं कर्तव्य टाळून वागणारे हे मुळात रामाचं अस्तित्व विसरून गेलेत असं म्हणावं लागेल. लबाडी करणारा माणूस आस्तिक असू शकत नाही. तो नास्तिकच असला पाहिजे. हिंदू धर्मात विषमता आणणारा, स्वतःला सनातनी म्हणवणारा वर्गच खरा नास्तिक आहे. मोदींनी पूजा करू नये म्हणणारे शंकराचार्य नास्तिक असले पाहिजेत आणि स्वतःचं सरकार म्हणून कर्तव्य विसरून निधर्मी न राहता मंदिराचं श्रेय घेणारं सरकार देखील नास्तिक असलं पाहिजे.
हिंदू धर्मात तुम्ही नास्तिक असू शकता. त्यामुळे त्यांच्या नास्तिकत्वाला विरोध नाही. ढोंगीपणाला आहे.
एक सश्रद्ध हिंदू म्हणून आणि स्वतंत्र भारताची नागरिक म्हणून ‘बाबरी मस्चीद पाडणं’ आणि ‘आज राम मंदिरामधला सरकारचा सहभाग’ हे दोन्ही मला पटलेलं नाही. आणि ही भूमिका घेणं हा सश्रद्ध हिंदू म्हणून माझा धर्म आणि जागरूक नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे.
(त. टी. आपण कुठल्या कल्टचा भाग होत नाही ना?, माझी आधात्मिक प्रगती हा अत्यंत वैयक्तिक प्रवास असतो, तो सुरु आहे ना? हे प्रश्न सश्रद्ध माणसाने सतत स्वतःला विचारत राहावेत असं मला वाटतं.)
मृदगंधा दीक्षित
(फेसबुक पेजवरून साभार) :