डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उंचीवरुन वाद, आठवलेंनी MMRDA अधिका-यांना धरले धारेवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारक पुतळ्याच्या उंचीवरुन वादात सापडण्याची शक्यता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची ३५० फुटांवरुन थेट २५१ फुट केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिली. यावरुन आठवले संतप्त झाले. शुक्रवारी स्मारकाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री आठवले यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती, त्यामध्ये हा खुलासा झाला आहे.

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकातील बाबासाहेबांचा पुतळा ३५० फुटांचा असावा अशी मागणी होती. मात्र एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी परस्पर पुतळ्याची उंची कमी करण्याचा घाट घातला. यावरुन आंबेडकरवादी आणि दलित संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक भव्यदिव्य असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार आपल्या भाषणातून सांगितले होते. मात्र अचानक पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय अधिकारी कसे काय घेतात? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

स्मारकाच्या आढावा बैठकीत हा प्रकार उघड झाल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. आता सरकार या प्रकरणी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment