Ramraje Naik Nimbalkar : रामराजे निंबाळकर तुतारी घेणार? साताऱ्याच्या राजकारणात काय घडतंय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेतेमंडळी या पक्षातून त्या पक्षात जात आहेत. खास करून शरद पवार हे सध्या चांगलेच ऍक्टिव्ह झाले असून भाजप महायुतीचे अनेक बडे नेते आपल्याकडे वळवत आहेत. कोल्हापूरचे राजे समरजित घाटगे हे पवारांच्या उपस्थितीत ३ सप्टेंबरला तुतारी हातात घेणार आहेत. तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील, अतुल बेनके यांच्यासह अनेक नेते पवारांच्या पक्षात जाण्यास इच्छुक असल्याचे बोललं जातंय. त्यातच आता सातारा जिल्ह्यातही मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळू शकेल, कारण अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी थेट तुतारी वाजवण्याचे संकेत दिले आहेत. असं झाल्यास बालेकिल्ल्यातच अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असेल.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवारांना साथ दिली. मात्र जिल्ह्यातच त्यांचे भाजप नेते जयकुमार गोरे आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्याशी असलेलं वैर सर्वश्रुत आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकर हे महायुतीचे उमेदवार असूनही रामराजेंनी त्यांना मदत केली नाही, उलट विरोधच केला. एवढच नव्हे तर हा उमेदवार जर हरला तर आम्ही जबाबदार नसेल असेही महायुतीच्या वरिष्ठाना सांगितलं होते. याच दोन्ही नेत्यांशी असलेल्या वादामुळे रामराजे निंबाळकर पुन्हा एकदा पवारांच्या पक्षात जाण्याची शक्यता आहे. फलटण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत सूचक असं भाष्य केलं आहे.

रामराजे काय म्हणाले?

कार्यकर्त्यांना संबोधित करताना रामराजे म्हणाले, तीन महिन्यांपूर्वी तुम्ही तुतारीची चर्चा सुरू केली, मी त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र यांची (रणजीत नाईक निंबाळकर व त्यांचे साथीदार) दहशत रोखली पाहिजे. आपलं भारतीय जनता पार्टीशी कोणत्याही प्रकारचं भांडण नाही. आपण हिंदू-मुस्लिम वाद करत नाही, कोणी गाय मारली तर आपण त्याला संरक्षण देत नाही. आपली तक्रार एकच आहे, रणजीत सिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या साथीदारांनी फलटणमधल्या गल्लोगल्ली जी दहशत निर्माण केली आहे, त्यांचे जे प्रकार चालू आहेत, त्याविरोधात आपण तक्रार केली आहे. त्यावर वरिष्ठांनी कारवाई करावी”. जर वरिष्ठानी आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही, किंवा आपल्या तक्रारीमुळे कोणताही फरक पडला नाही तर आपल्याला तुतारी वाजवायला किती वेळ लागतोय. अजून काही बोलायचं बाकी राहिलं आहे का? असा रामराजे म्हणाले. रामराजेंच्या तोंडात तुतारी हा शब्द पडताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यामुळे आगामी काळात रामराजे तुतारी हातात घेऊन शरद पवारांना साथ देणार का ते पाहावं लागेल. असं झाल्यास साताऱ्याचे राजकारण बदलण्याची शक्यता आहे.