कराड | प्रत्येक गावाचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. मात्र साताऱ्यातील आपशिंगे हे गाव मात्र अश्या वेगळ्या कारणाने प्रसिद्ध आहे. गावातील प्रत्येक घरातल्या एकातरी व्यक्तीने सैन्यात भरती व्हायचंच असा इकडे अलिखित नियम आहे. या गावात ८५० कुटूंब आहेत. इथली लोकसंख्या जवळपास ६ हजाराच्या घरात आहे. तर त्यापैकी ५०० हून अधिक लोकं सैन्यात आहेत. नुकताच या गावाला आर्मीकडून एक रणगाडा भेट देण्यात आला आहे. गावातील प्रत्येक घरातील किमान एक तरी मुलगा सैन्यामध्ये असलेल्या गावात आता प्रत्यक्ष रणगाडा आल्याने गावकऱ्यांची मान अभिमानाने उंचावली आहे. बहुदा सातारा जिल्ह्यातील अपशिग हे एकच गाव असेल की त्या ठिकाणी रणगाडा आहे.
साताऱ्यातील आपशिंगे या गावात नुकतेच मिलिटरी येथून एक रणगाडा देण्यात आला आहे. त्याचे ग्रामस्थांनी जल्लोशी स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांनी गावातून या रणगाड्याची तुतारीच्या निनादात भव्य अशी मिरवणूक काढली. तर गावातील महिलांनी रणगाड्याचे हळदी कुंकु लावून पूजन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सैन्यात असणारं एक गाव म्हणजे आपशिंगे मिलिटरी गाव. सातारा जिल्ह्यापासून १८ किमी अंतरावर असणाऱ्या या गावात आजही प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती सैन्यात आहे. साताऱ्यात तसं पाहायला गेलं तर अनेक मिलिटरी शाळा आहेत. सैनिकांचा वाढता ओघ बघता इथल्या मिलिटरी स्कूलची व्याप्ती वाढत गेली आणि हे गाव जगाच्या नकाशावर झळकू लागलं.
तसं पाहायला गेलं तर आपशिंगे गावात एकही मिलिटरी स्कूल नाहीये. त्यासाठी त्यांना सातारा किंवा पुण्यात जावं लागतं. पण इकडच्या तरुणांना लहानपणापासूनच आर्मीचे डोस मिळतात ते इकडच्या निवृत्त झालेल्या जवानांकडून. या गावात अनेक निवृत्त जवान आहेत. त्यामुळे गावाला एक वेगळीच शिस्त आहे. गावातील तरुणही त्यांची शिस्त पाळतात. सैनिकात जायचं म्हणजे अंगी शिस्त असणं फार महत्त्वाचं असतं. निवृत्त जवानांकडून सैन्याचे बाळकडून मिळाल्यानंतर ते सैनिक शाळेत भरती होतात आणि सीमेवर लढण्यास सज्ज होतात.
काय आहे गावचा इतिहास
या गावाचं नाव आपशिंगे मिलिटरी असं नाव पडण्यामागे एक इतिहास आहे. पहिल्या महायुद्धात या गावातील अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. त्यामुळे ब्रिटिशांनीच या गावाचं नाव आपशिंगे मिलिटरी असं ठेवलं, असं सांगण्यात येतं. पहिल्या महायुद्धात या गावातील जवळपास ४६ जवान शहिद झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अनेक युद्ध झाली. त्या प्रत्येक युद्धात या गावातील सैनिक होताच. १९६२ साली चीनविरुद्ध झालेल्या युद्धात या गावातील ४ जवान शहीद झाले. तर, १९६५ साली पाकिस्तानविरोधात झालेल्या युद्धात या गावातील २ जवांनाना आपल्या प्राणाला मुकावे लागले होते. त्यानंतर पुन्हा १९७१ साली पाकिस्तानसोबत युद्ध झालं, त्यावेळी एका जवानाने आपले प्राण अर्पण केले होते. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतही या गावातील ४ जवान सामिल झाले होते. असा रंजक इतिहास या गावाला आहे. या गावातील अनेकांची आडनावे निकम आहेत. ते निकुंभ राजपूत या घराण्याचे वारस असल्याचे सांगितलं जातं.