नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाच्या ४६ व्या सरन्यायाधीशपदी रंजन गोगोई याची नियुक्ती करण्यात आली आहे. आज त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. मावळते सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सप्टेंबरमध्ये सेवाज्येष्ठतेनुसार गोगोई यांच्या नावाची शिफारस सरन्यायाधीशपदासाठी केली होती. नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिल्यानंतर कायदा मंत्रालयाने अधिसूचना जारी करत गोगोई यांच्या नियुक्तीचे आदेश दिले होते.
राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोगोई यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. गोगोई यांचा कार्यकाल नोव्हेंबर २०१९ पर्यंत असून त्यांना एकूण १३ महिने त्यांना कार्यभार सांभाळावा लागेल.
मावळते सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कामावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली होती.महत्वाचे म्हणजे त्यात न्या जे. चेलमेश्वर, न्या. मदन बी. लोकूर, न्या. कुरियन जोसेफ यांच्यासह न्या. रंजन गोगोई यांचा समावेश होता.
गोगोई २३ एप्रिल २०१२ पासून ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. गुवाहाटी उच्च न्यायालयात न्या. रंजन गोगोई यांनी अनेक वर्ष कारभार सांभाळा आहे .