ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांना 25 जानेवारीला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करा : रणजीत जाधव यांची सरकारकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

देशाला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले ऑलिंपिक पदक मिळवून देणाऱ्या साताऱ्यातील गोळेश्वर (ता. कराड) गावचे सुपूत्र पै. खाशाबा जाधव यांना जयंतीनिमित्त आज गुगलकडून खास डूडलद्वारे अभिवादन करण्यात आले. मात्र, राज्य शासनाने खाशाबांची दखल घेतली नाही. खाशाबांना अद्यापही पद्म पुरस्कार देऊन गौरवलेले नाही, त्याबद्दल माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी खंत व्यक्त केल्यानंतर आता खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तसेच खाशाबा जाधव यांना 25 जानेवारीला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी जाधव यांनी केंद्र व राज्य सरकारकडे केली आहे.

कराड येथे पैलवान खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राजश्री शाहू महाराज यांचे वंशज असलेल्या संभाजी महाराज यांनी आज राज्य सरकारकडे मागणी केली आहे. मला वाटते कि त्याच्या आजोबांनी वडील खाशाबा जाधव यांना 1948 साली मदत केलेली होती.

राजाश्रयही दिला होता. त्यानंतर खाशाबा जाधव यांनी ऐतिहासिक अशी कामगिरी केली. त्याच्या या कार्याची आज गुगलनेही दखल घेतली आहे. त्यांनी त्यांना मानवंदना दिलेली आहे. आज जर जगातील प्लॅटफॉम त्याच्या कार्याची दखल घेत असेल तर आपले भरत सरकार व महाराष्ट्रातील सरकार त्यांना गौरवीत करण्यासाठी का मागे पडत आहे? हा माझा प्रश्न आहे.

त्यामुळे येणाऱ्या 25 जानेवारी भारत सरकारकडून खाशाबा जाधव यांना पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव करेल. त्याच्या नावाने जे कुस्ती संकुल घोषित केलेले आहे. जे 14 वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र, त्याचा जीआर अद्याप आलेला नाही. जेव्हा वेळोवेळी कुस्ती स्पर्धा चालू होतात आणि मधेच बंद पडतात. त्याच्यावर योग्य निर्णय घेतला जाईल. आणि त्यांना महाराष्ट्र भूषणने सन्मानित केले जाईल, अशी यानिमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो, असे रणजित जाधव यांनी सांगितले.

 

दरम्यान, आज कराड येथील कार्वेनाका येथे असलेल्या स्व. खाशाबा जाधव यांच्या स्मृती स्तंभास त्यांच्या जयंती निमित्त त्यांचे सुपुत्र रणजीत जाधव तसेच गोळेश्वरचे सरपंच व स्व. खाशाबा जाधव प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

स्वतंत्र भारताचे पहिले ऑलिंपिकवीर

खाशाबा जाधव हे स्वतंत्र भारतातील पहिले ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीगीर होते. 1952 साली हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये फ्री स्टाईल कुस्ती या वैयक्तिक क्रीडा प्रकारात त्यांनी कांस्यपदक पटकावत भारताचे नाव जगात उंचावले होते. भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले ते पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते होते.

कराडजवळच्या गोळेश्वर गावात जन्म

खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी कराड तालुक्यातील गोळेश्वर या गावात झाला. त्यांच्या कुटुंबाला कुस्तीचा वारसा होता. मल्लविद्या आणि शिक्षणासाठी ते कुस्तीची पंढरी असलेल्या कोल्हापूरला गेले. पुढे कोल्हापूरच त्यांना ऑलिंपिकपर्यंत घेऊन गेले. त्यांची मेहनत आणि जिद्द त्यांना पदकापर्यंत घेऊन गेली. खाशाबांनंतर ऑलिंपिकमध्ये तब्बल 44 वर्षांनी भारताला वैयक्तिक पदक मिळाले.