औरंगाबाद | काही दिवसांपूर्वी उद्योजकाला मारहाण केल्याची घटना औरंगाबाद शहरात उघडकीस आली होती. ही घटना संपूर्ण राज्यभर चर्चेत असतानाच एका उद्योजकाला ठार मारण्याची सुपारी दिली, अशी धमकी देत पाच लाखांची खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या गुन्ह्यातील दोघांना अटक केली असून दौलताबाद पोलिसांनी गुरुवारी नागपूर-मुंबई महामार्गावरील करोडी चौफुलीवरील एका हॉटेलसमोर ही कारवाई करण्यात आली.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, उद्योजक सय्यद नजीर सय्यद ताहेर (वय 49 रा. हुसेन कॉलनी, गारखेडा) यांची करोडी गट क्रमांक 40 मध्ये कंपनी आहे. त्यांच्या घरात कौटुंबिक माहिती आरोपी शेख शहानुर याला होती. शेख शहानुर हा त्यांच्या ओळखीचा होता. त्याचाच फायदा आरोपीने उचलला व उद्योजक नजीर यांना जीवाला धोका असल्याचे सांगतीले. तसेच तुम्हाला मारण्याची सुपारी इमरानला दिली असल्याचे म्हणाला. इमरान माझ्या ओळखीचा आहे. आपण त्याच्याशी बातचित करून तडजोड करू असंही तो म्हणाला.
कौटुंबिक कलहातून आपली कोणीही सुपारी देणार नाही याची खात्री उद्योजक शेख नजीर यांना होती त्यामुळे त्यांना संशय आला. आणि शेख शहानुर व इम्रान हे दोघेही ब्लॅकमेलर असल्याचे नजीर यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी संशय घेत पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांची भेट घेतली. त्यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर अधिकृत तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी खंडणी घेण्यासाठी नागपूर महामार्गावरील एका हॉटेलवर येणार असल्याची खात्री पटल्यानंतर आरोपींना पकडले आणि अटक केली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोवर्धन चव्हाण करत आहेत.