टीम, HELLO महाराष्ट्र |चार दिवसांपूर्वी झालेल्या हैदराबाद मधील पशुवैद्यक असलेल्या तरुणीच्या बलात्काराच्या घटनेनंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली. सर्व माध्यमातून या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. देशातील अनेक मान्यवर , सेलेब्रिटी यांनी देखील घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
याच पार्श्वभूमीवर जेष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांनी देखील या घटनेवर राज्यसभेमध्ये आवाज उठवला आहे. ”आरोपींना जनतेसमोर ठेचून मारलं पाहिजे” अशा तीव्र शब्दात त्यांनी हैदराबाद येथील घटनेवर संसदेत संताप व्यक्त केला. तसेच त्यांनी त्या परिसरातील सुरक्षाकर्मींवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
महिला आणि इतर सामाजिक विषयांवर जया बच्चन नेहमीच आपलं म्हणणं मुद्देसूदपणे राज्यसभेत मांडतात. मात्र, हैद्राबाद येथील भयावह घटनेनंतर आज जया बच्चन बोलत असताना त्यांच्या बोलण्यात एक संतापाची भावना दिसून आली. जया बच्चन बोलत असतांना सभागृहातील इतर महिला सदस्यांनी सुद्धा त्याच्या बोलण्याला दाद दिली.