हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेने प्रवास करताना अनेकजण IRCTC मार्फत देण्यात येणाऱ्या कॅटरिंग सुविधेचा लाभ घेतात व आपली प्रवासादरम्यानची भूक भागवतात. परंतु ऑक्टोबर 15 रोजी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ बघून IRCTC च्या कॅटरिंग सुविधेवर मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या विडिओ मध्ये ट्रेनच्या पॅन्ट्रीमध्ये उंदीर मुक्तपणे फिरत असताना दिसत आहेत. त्यामुळे IRCTC मार्फत रेल्वे प्रवाश्यांना देण्यात येणाऱ्या खाण्याच्या पदार्थची कितपत स्वच्छता ठेवली जाते याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
प्रवाश्याने काढल पॅन्ट्री कार मधील व्हिडिओ :
IRCTC मार्फत चालवण्यात येणाऱ्या रेल्वेच्या पॅन्ट्री कारचा हा व्हिडीओ असून हा व्हिडिओ मूळतः मंगेश तेंडुलकर या वापरकर्त्याने Instagram वर पोस्ट केला आहे.15 ऑक्टोबर रोजी 11099 लोकमान्य टिळक टर्मिनल ते मडगांव दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस मधील पॅन्ट्रीचा हा व्हिडिओ आहे .त्यांनी त्यांच्या प्रवासादरम्यान, ट्रेनच्या पँट्री कारमध्ये उंदीर मुक्तपणे फिरताना पाहून हा व्हिडिओ आपल्या मोबाईलच्या माध्यमातून बनवून शेअर केला आहे.
रेल्वे अधिकाऱ्याचा योग्य प्रतिसाद मिळेना :
मंगेश तेंडुलकर यांनी सांगितले की, 15 ऑक्टोबर रोजी ( 11099 )लोकमान्य टिळक टर्मिनल ते मडगांव दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसमध्ये आम्ही प्रवास करत होतो. तेव्हा हा संपूर्ण प्रकार त्यांनी पहिला. रेल्वेच्या पॅन्ट्री कारमध्ये सुरवातीला 6-7 उंदीर फिरताना दिसून आले ते सर्व पॅन्ट्री कार मधील अन्न पदार्थ बनवत असलेल्या भांड्यात खेळताना दिसून आले. त्यानंतर मी त्याचा व्हिडिओ बनवला तो समाज माध्यमातून प्रकाशित केला. यासंदर्भात तेंडुलकर यांनी रेल्वे पोलीस व स्टेशन मॅनेजरला तक्रार केली असता त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही असेही त्यांनी सांगितले आहे.
IRCTC यांनी दिले स्पष्टीकरण :
याबाबतीत IRCTC चे स्पष्टीकरण समोर आले आहे. ज्यामध्ये IRCTC ने सांगितले आहे की, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. पॅन्ट्री कारमधील स्वच्छता आणि स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी पॅन्ट्री कार कर्मचाऱ्यांना संवेदनशील करण्यात आले आहे. संबंधितांना प्रभावी कीटक आणि उंदीर नियंत्रण उपाय सुनिश्चित करण्यासाठी योग्य सल्ला देण्यात आला आहे, ज्याची खात्री केली जात आहे.