नवी दिल्ली । देशात एकिकडे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक नियम लागू करण्यात आलेले असतानाच नियमांच्या या सत्रामध्ये आता आज म्हणजेच १ जूनपासून काही महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. रेल्वे, गॅस सिलेंडर, पेट्रोल-डिझेल यांची भाववाड तसेच रेशन कार्ड आणि रेल्वेच्या नियमातील बदलांचा यात समावेश आहे. यांपैकी काही बदलांमुळं नागरिकांना अंशत: सूट मिळणार आहे. तर, काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला याचा फटकाही बसू शकतो.
लागू होणार ‘एक देश एक रेशन कार्ड’
देशभरातील गरीब जनतेला दिलासा देण्यासाठी म्हणून जवळपास २० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘वन नेशन वन कार्ड’ ही योजना राबवण्यात येणार आहे. ज्याअंतर्गत दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांना देशातील कोणत्याही भागात त्यांच्या रेशन कार्डच्या माध्यमातून धान्य मिळवता येणार आहे. जवळपास ६७ कोटी जनतेला याचा फायदा होईल. तीन रुपये प्रतिकिलो तांदूळ आणि दोन रुपये प्रतिकिलो गहू या दरानं धान्यवाटप करण्यात येणार आहे. स्थानिक, हिंदी किंवा इंग्रजी अशा भाषांमध्ये हे रेशन कार्ड दिलं जाईल. याशिवाय रेशन कार्ड आधार कार्डाशी जोडण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर असल्याचंही केंद्रीय अन्नपुरवठा मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
घरगुती वापरातील सिलेंडरच्या दरात बदल
सामान्यांच्या खिशाला झळ बसणारी बातमी आहे. आजपासून १४ आणि १९ किलोंचा एलपीजी गॅस महागला आहे. १४ किलोचा गॅस सिलेंडर मुंबई आणि दिल्लीत ११ रुपये ५० पैशांनी महागला आहे. १९ किलो किंमतीचा गॅस सिलेंडर राजधानी दिल्लीत ११० रुपयांनी तर मुंबईमध्ये १०९ रुपयांनी महागला आहे.
रॉकेलच्या किंमतीत कपात
तेल कंपनीने रॉकेलच्या किंमतीत कपात केली आहे. दिल्ली रॉकेल फ्री राज्य म्हणून घोषित केल्यामुळे तेथील किंमती जाहिर होत नाहीत. कोलकातामध्ये आज रॉकेलच्या किंमतीत १२ रुपये १२ पैशांनी कपात झाली. मुंबईत रॉकेल प्रतिलीटर १३ रुपये ८६ पैसे झाले आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ
अनेक राज्यात वॅटच्या किंमती वाढवल्यामुळे पेट्रोल आणि डिजेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मिझोराम सरकारने एक जूनपासून राज्यात पेट्रोलवर २.५ टक्के आणि डिझेलवर ५ टक्के वॅट लावला आहे. त्यामुळे राज्यातील पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली. केंद्रशासित प्रदेश जम्मू-कश्मीर आणि महाराष्ट्र यासारख्या राज्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. सोमवारपासून (१ जून) महराष्ट्रात मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत सर्वत्र पेट्रोल व डिझेल महाग होणार असून या दरवाढीमुळे पुढील १० महिन्यांत राज्य सरकारला तीन हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल. राज्यात पेट्रोलवर २६ टक्के आणि डिझेलवर २४ टक्के वॅट आहे. तर पेट्रोलवरील अधिभार आता १०.१२ रुपये करण्यात आला आहे. याआधी तो ८.१२ रुपये होता. डिझेलवरील अधिभार १ रुपयांवरून ३ रुपये करण्यात आला आहे.
आजपासून २०० रेल्वे धावणार, प्रवासापूर्वी वाचा नियम
लॉकडाउनच्या पाचव्या टप्याच्या सुरूवातीलाच २०० नव्या रेल्वे गाड्या धावनार आहेत. यापूर्वी १२ मे पासून राजधानी एक्स्प्रेससारख्या ३० रेल्वे धावत होत्या. आता एक जूनपासून एकूण २३० रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. या सर्व रेल्वे मेल आणि एक्स्परेस आहेत. या रेल्वेंना वेळापत्रकानुसार चालवले जाणार आहे. या सेवेच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी देशभरातून १ लाख ४५ हजार प्रवासी प्रवास करणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
सार्वजनिक वाहतुक सेवेला सुरुवात
उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांनी परिवहन मंडळाच्या बसेस सोडण्याला मंजूरी दिली आहे. बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडे मास्क असणे बंधनकारक आहे. बसला वांवार सॅनेटाइज केलं जाईल. त्याशिवाय बसमध्ये बसताना किंवा उतरताना सोशल डिस्टेन्सिंगचा वापर करणे अनिवार्य केलं आहे.
विमान प्रवास महागला
एविएशन टर्बाइन फ्यूल (ATF) च्या किंमतीत वाढ झाल्यामुळे विमान प्रवासही महागला आहे. इंडियन ऑयलच्या संकेतस्थळानुसार, राजधानी दिल्लीत एटीएफचा दर 11030.62 रुपये प्रति किलोलीटरने वाढून 33,575.37 रुपये प्रति किलोलीटर झाला आहे.
गो एअरसह इतर विमान कंपन्या देशांतर्गत सेवा सुरू करणार
स्वस्तात सेवा देणारी विमान कंपनी गो एअर देशांतर्गत विमानसेवा सुरू केली आहे. याशिवाय इतर काही विमानकंपनीनेही २५ मे पासून देशांतर्गत वाहतूक सुरू केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”