हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील केशरी रेशनकार्डधारक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील केशरी रेशनकार्डधारक (Ration Card Holders) शेतकऱ्यांसाठी थेट रोख रक्कम हस्तांतरण (DBT) योजनेस मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे.
राज्यात शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी आणि त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने जानेवारी 2023 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला लाभार्थ्यांना दरमहा 150 रुपये आर्थिक मदत दिली जात होती. मात्र, 20 जून 2024 पासून या मदतीत वाढ करून ती 170 रुपये प्रति लाभार्थी करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या योजनेचे फायदे
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे.
मदतीचे पैसे आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जातील.
यापूर्वी योजनेअंतर्गत 150 रुपये प्रति लाभार्थी मिळत होते, आता ही रक्कम 170 रुपये करण्यात आली आहे.
थेट रोख रक्कम हस्तांतरणासाठी डीबीटी प्रणालीचा वापर केला जाणार आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार?
छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील सर्व तसेच वर्धा जिल्ह्यातील संकटग्रस्त केशरी रेशनकार्डधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. यामुळे त्यांना नियमित आर्थिक सहाय्य मिळेल, ज्याचा उपयोग ते आपल्या शेतीच्या गरजा भागवण्यासाठी किंवा इतर आर्थिक आवश्यकतांसाठी करू शकतील.
अर्ज करण्याची प्रक्रिया
शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्या स्थानिक स्वस्त धान्य दुकानात संपर्क साधावा. अर्ज करताना त्यांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील:
- बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकीत प्रत
- रेशनकार्डच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची प्रत
दरम्यान, राज्य सरकारने 14 जिल्ह्यांतील केशरी रेशनकार्डधारक शेतकऱ्यांसाठी नवीन लेखाशिर्ष प्रस्तावित केला आहे. याला अंतिम मान्यता ही देण्यात आली आहे. या निर्णयामुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.