हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. यात पुण्यातून भाजपने मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारीचे तिकीट दिले आहे. त्यामुळे आता पुण्यात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे. अशातच भाजपने काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. रवींद्र धंगेकर यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून भाजपने ट्रोलिंग सुरू केले आहे.
सध्या सोशल मीडियावर “मविआचा अशिक्षित उमेदवार” आणि “रवींद्र धंगेकर फक्त 8वी पास !” असे मेसेज व्हायरल होत आहेत. यासह “शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्याचा उमेदवारच अशिक्षित” अशा शब्दात रवींद्र धंगेकर यांना ट्रोल केले जात आहे. म्हणजेच शिक्षणाचा वापर करून भाजपकडून धंगेकरांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु या ट्रोलिंगला धंगेकरांनी सडेतोड उत्तर दिले आहे. आता धंगेकरच भाजपच्या ट्रोलर्सचा पुरेपूर समाचार घेताना दिसत आहेत.
आता भाजपच्या ट्रोलर्सला उत्तर देताना, ते माझ्या शिक्षणावर घसरलेत म्हणजे ( त्यांना) त्यांचा पराभव दिसतोय, असे धंगेकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, माझी जनतेत पीएचडी झाली आहे, जनतेनं मला पीएचडीचं प्रमाणपत्र दिलं आहे, असा विश्वास धंगेकरांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता पुण्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा घासून सामना होईल, अशी चिन्हे दिसण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या सगळ्यात लोकसभा निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारेल, हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी पुण्यामध्ये आचारसंहितेचा भंग केला असल्याचा आरोप भाजपकडून लावण्यात आला होता. त्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले होते. भाजपच्या या आरोपांनंतर काँग्रेसने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन पत्र दिले. यावेळी, पुण्यातील काही भागात कमळ चिन्हाचे वॉल पेंटिंग भाजपकडून करण्यात येत असल्याचे काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना दाखवले. तसेच, या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही तर कार्यालयाच्या बाहेर काँग्रेस पक्षाचे चिन्ह लावणार, असा इशारा रवींद्र धंगेकर यांनी दिला.