पुण्यात गुलाल फिक्सय… धंगेकरांच्या विजयाचं गणित फिट्ट बसतंय??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । धंगेकर इज बॅक. पुण्यात पुन्हा एकदा धंगेकर पॅटर्नच चालणार. भाजपनं मोठ्या कष्टानं बांधलेल्या पुण्याच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडणार… अशी चर्चा सध्या होतेय राज्याची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात. चौथ्या टप्प्यात होत असणाऱ्या पुणे लोकसभेची निवडणूक (Pune Lok sabha Election 2024) ही पहिल्यांदाच तिरंगी होतेय. भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर वंचितकडून वसंत मोरे. पण मुख्य लढत असणारय ती धंगेकर विरुद्ध मोहोळ अशी. पुण्याच्या निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना भाजपचं केडर पुणे पिंजून काढत असलं तरीदेखील वारं हे धंगेकरांच्या बाजूने दिसतंय. मोहोळांची ताकद मोडीत काढत धंगेकर आमदारा पाठोपाठ आता थेट दिल्लीत जातील, असं आम्ही का म्हणतोय? मोहोळांचा कनेक्ट, फेस व्हॅल्यू आणि भाजपनं लावलेली ताकद हे सगळं प्लस मध्ये असताना पुण्याचा गुलाल धंगेकरांनाच लागण्याचे चान्सेस का वाढलेत? हेच सविस्तर पाहूया …..

पुणे तसं भाजपचा बालेकिल्ला. सुरेश कलमाडीनंतर भाजपने विधानसभा, लोकसभा आणि मग जिल्हा परिषद असं करत पुण्यात भाजपचा दबदबा निर्माण केला. पण रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) कसबा पोट निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचा अभेद्य बालेकिल्ला फोडलाच. यानंतर आता लोकसभेला गिरीश बापटांनंतर नवा चेहरा देण्यासाठी भाजपनं मुरलीधर मोहोळ यांना रिंगणात उतरवलय. पुण्यातील आपला स्ट्रॉंग केडर, आमदारांची फळी, महायुतीची ताकद या सगळ्यांमुळे यंदा ‘मोहोळ फिक्स’ असं वातावरण असताना धंगेकरांच्या एन्ट्रीने मात्र या स्वप्नांचा चुराडा झालाय. कारण विधानसभेला धंगेकरांनी जे काही करून दाखवलं अगदी सेम टू सेम लोकसभेलाही तोच शो धंगेकर रिपीट करतील अशी चिन्ह आहेत. कारण मागच्या काही दिवसात पुण्यावरील होल्ड धंगेकरांनी चांगला स्ट्रॉंग केलाय.

Pune Lok Sabha : भाजपच्या Murlidhar Mohol यांना,  Ravindra Dhangekar ब्रँड भारी पडणार.

पुण्यातील वारं खरं फिरलं ते राहुल गांधी यांच्या सभेनंतर… खास धंगेकरांसाठी घेतलेल्या या सभेत गांधींनी भाजप सरकारच्या अनेक फसव्या दाव्यांची पोलखोल केली एवढंच नाही तर वंचित, दलित आणि अल्पसंख्यांकांच्या राजकारणाची लाईन मोठी केली. याचा मोठा इम्पॅक्ट पुण्यावरती पडू शकतो. पुणे लोकसभा मतदारसंघ शहरी असला तरी इथे अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय समाजाची संख्या मोठी आहे. यासोबतच दलित आणि मुस्लिम समाज या सगळ्यांची मतं एकगठ्ठा धंगेकरांच्याच पाठीशी राहतील. असं चित्र सध्या पुण्यात दिसतंय. वसंत मोरे मैदानात असले तरी वंचितचा इफेक्ट यंदा अंधुकसा असल्याचं दिसतंय. याचा अडवांटेज अर्थातच काँग्रेसला होऊ शकतो… मुस्लिम मतं, दलित मतं, भाजप विरोधी मत, काँग्रेस समर्थक मत, पवार आणि ठाकरे यांच्या सहानुभूतीचे मतं हे सगळं जोडून पाहिलं तर धंगेकर पुण्याचं मैदान आरामशीर मारताना दिसतायत…

दुसरी गोष्ट काँग्रेसच्या मागच्या दोन निवडणुका पाहिल्या तर निवडणुकीत उतरलेला उमेदवाराला म्हणावी इतकी फेस व्हॅल्यू नव्हती. 2014 च्या निवडणुकीत बाहेरून आलेल्या विश्वजीत कदमांनी तर 2019 ला मोहन जोशी गिरीश बापटांच्या विरोधात होते. काँग्रेसकडे या दोन्ही वेळेस खासदारकीसाठी स्ट्रॉंग कॅंडिडेट नसल्याने लोकसभेला नेहमीच पाणीपत होत होतं. पण 2024 ला परिस्थिती वेगळी आहे. कसब्यात धंगेकरांनी भाजपचा बालेकिल्ला फोडल्यापासून त्यांचं नाव पुण्यातच नाही तर राज्याच्या राजकारणात चांगलंच गाजतय. या आधीच्या निवडणुकीत काँग्रेसला पक्षाचा उमेदवार आणि चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक घराचे उंबरे झिजवावे लागायचे. पण धंगेकरांच्या उमेदवारीने हा प्रश्नच मिटलाय. मुरलीधर मोहोळ लोकप्रतिनिधी म्हणून उत्तम असले… महापौर पदाच्या काळात त्यांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी… शांत, संयमी आणि मिळून मिसळून जाणारा खासदार या सगळ्या त्यांच्या जमेच्या बाजू असल्या तरी एक बाजू त्यांची पडती आहे. ती म्हणजे भाजपच्या कमळ चिन्हावर लढवावी लागणारी निवडणूक. वाढलेली महागाई, गगनाला भिडलेले इंधनचे दर, बेरोजगारी या आणि अशा अनेक गोष्टींनी लोकांच्या मनात भाजपच्या विरोधात राग आहे. विशेषतः शहरी मतदार हा कुणाच्या प्रभावाखाली न येता आपल्याला पटेल त्यालाच मत देत असतो. याचा फटका मोहोळांना बसू शकतो. “पुण्याला जनतेचा मोहोळ हवा, मोदींचा नको” अशी मोहोळांच्या उमेदवारीवर धंगेकरांनी कमेंट करून कमळ चिन्ह काही प्रमाणात का होईना मोहोळ यांना लॉस मध्ये घेऊन जाणार, याचे चान्सेस आहेत…

विधानसभा निहाय पक्षीय बलबलाचा विचार करता महायुतीचं पारड जड वाटत असलं तरी पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार अवघ्या काही मतांच्या फरकाने पडले आहेत. वंचितच्या उमेदवारीने क्रॉस वोटिंग झाल्याने भाजपाला फायदा झाला होता. पण या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा बेस मजबूत आहे. त्यात धंगेकरांच्या उमेदवारीने त्याला आणखीन बळ मिळालंय… त्यामूळे कसब्याचा त्यांचा हक्काचा गड सोडला तर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, पर्वती आणि इतर विधानसभांमधूनही धंगेकरांना चांगलं लीड मिळू शकतं…

पुण्याची निवडणूक तशी फ्रेंडली सुरू आहे. उमेदवार एकत्र येतायत, गप्पा मारतायत, चर्चा करतायत. त्यात मुख्य तीन उमेदवारांमध्ये मैत्रीचे घट्ट धागे आहेत. त्यामुळे पुण्यातील लढत तशी समान सुटीत निघणारी आहे. पण मोदींच्या विरोधात वातावरण असल्यानं याचा फायदा धंगेकर सध्या उचलताना दिसतायत…महाविकास आघाडीने लावलेली ताकद, शरद पवारांनी जातीने लक्ष घालणं, राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीच्या सहानुभूतीची लाट, भाजपच्या विरोधातील वातावरण हे सगळं गणित 13 तारखेच्या मतदानाच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरणार आहे …ही सगळी लढत काट्याला काटा अशी घासून होणार असली तरी निकालाचं पारड हे थोडंफार काँग्रेसच्या बाजूने झुकलंय, असं बोललं तर नक्कीच अतिशयोक्ती राहणार नाही…सध्याचं पुण्यातील वातावरण पाहता धंगेकर आमदारकी पाठोपाठ आता खासदारही होतील का? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.