रयत क्रांतीने अतिवृष्टी मदतीचा शासनाचा अध्यादेश फाडून निषेध

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

अतिवृष्टीतील बाधीतांना देण्यात येणारी मदत ही अत्यंत तोकडी असुन त्यामध्ये वाढ करावी, अशी मागणी करत रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कराड येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी शासनाने काढलेला मदतीचा आद्यादेश त्यांनी फाडून मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिल्याची माहिती संघटनेचे नेते सचिन नलवडे यांनी दिली.

महापुर, अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी खचला आहे. शेतकऱ्यांना शासनाकडुन भरीव मदतीची अपेक्षा होती. मात्र शासनाने अद्यादेश काढुन केवळ तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला आहे, असा आरोप करुन श्री. नलवडे म्हणाले, अतिवृष्टीतील बाधीतांना देण्यात येणारी हेक्टरी दहा व पंधरा हजारांची मदत ही अत्यंत तोकडी आहे. त्यामध्ये वाढ करुन बागायती शेतीसाठी हेक्टरी 1 लाख आणि जिरायती जमिनीसाठी हेक्टरी 60 हजार रुपये देण्याची आमची मागणी आहे.

शासनाने ती मदत तातडीने शेतकऱ्यांना द्यावी यासाठी आम्ही शासनाने काढलेल्या अद्यादेश फाडुन निषेध व्यक्त करत आहोत. वाढीव मदत मिळाली नाही तर यापुढेही तीव्र आंदोलन करु असा इशारा तहसीलदार यांना निवेदन देवुन शासनाला दिला आहे. येणाऱ्या गळीत हंगामात शेतकऱ्यांनी कष्ट करुन पिकवलेल्या ऊसाला एकरकमी एफआरपी द्यावी अशीही मागणी केल्याचे श्री. नलवडे यांनी सांगीतले. यावेळी संघटनेचे अशोक लोहार, योगेश झांबरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

You might also like