रयत शिक्षण संस्थेकडून चंद्रकांत पाटीलांच्या ‘त्या’ विधानाबाबत पत्रक जाहीर; कर्मवीरांनी काय केलं?

0
173
chandrakanat patil rayat shikshan sanstha
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होत. त्यांच्या या विधानाचा थेट रयत शिक्षण संस्थेनेच निषेध नोंदविला आहे. चंद्रकांत पाटील यांचे विधान दुर्दैवी आहे असं म्हणतातच रयत शिक्षण संस्थने संपूर्ण जडणघडणीबाबतच उलगडा केला आहे. अण्णांनी संस्थेची स्थापना करताना काय काय केलं? कसा पैसे गोळा केला याबाबतचा इतिहासच रयत शिक्षण संस्थेनं सांगितला आहे. याबाबतच एक पत्रकच रयतने सादर केलं आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या पत्रकात नेमकं काय ?

महाराष्ट्राच्या बहुजन समाजातील गोर-गरीब, डोंगर दऱ्यांमध्ये राहणाऱ्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १०३ वर्षापूर्वी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे एकमेव साधन आहे ही कर्मवीरांची दूरदृष्टी होती. म्हणून त्यांनी या मुलांच्या शिक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. किर्लोस्कर, ओगले, कूपर या कंपनीमध्ये कर्मवीरांनी जे काम केले त्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न, त्यांच्याकडे असलेल्या शेतीच्या माध्यमातील उत्पन्न, किर्लोस्कर कंपनीतील अण्णांचे शेअर्स, आई- वडीलांच्या नावे असलेली शिल्लक रक्कम, पत्नी सौ. लक्ष्मीबाई यांच्या माहेरकडून मिळालेले १०० तोळे सोने, मंगळसूत्र सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केले अशी माहिती संस्थेने दिली.

विद्यार्थ्यांनी भीक मागून शिकण्यापेक्षा स्वावलंबनाने, स्वकष्टाने आपले शिक्षण पूर्ण करावे हे कर्मवीरांचे शैक्षणिक तत्वज्ञान होते. यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कमवा व शिका’ ही अभिनव योजना राबविली. आज या योजनेला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. म्हणूनच स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ हे कर्मवीरांनी संस्थेचे ब्रीद घेतले. कर्मवीरांच्या या कार्याला समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन लोकसहभागातून ही शैक्षणिक चळवळ अधिकाधिक व्यापक केली.

बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी समाजाने उत्स्फूर्त सहभाग घेतला. या माध्यमातून कोट्यावधी मुलांना शिक्षण मिळाले. आज महाराष्ट्र शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर दिसतो आहे त्याला अण्णांचे स्वावलंबी शिक्षणाचे हे तत्वच कारणीभूत आहे असे म्हटले तर अनुचित ठरणार नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज हे कर्मवीरांचे आदर्श होते. याच कालखंडात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा कर्मवीरांना मोठे सहकार्य लाभले. म्हणून ज्ञानाने समृद्ध असलेली पिढी कर्मवीर निर्माण करू शकले. या सर्व पार्श्वभूमीवर ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी काल केलेले विधान अत्यंत दुर्देवी आहे. असं म्हणत रयत शिक्षण संस्थेने त्यांच्या विधानाचा निषेध केला आहे.