नवी दिल्ली । रिझर्व्ह बँकेने चलनविषयक धोरण समितीचे निकाल शुक्रवारी जाहीर केले. आर्थिक सुधारणांना प्राधान्य देत रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले.
दास म्हणाले की,”सध्या आम्ही रेपो दर 4 टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. यामुळे पतपुरवठ्यात वाढ होऊन अर्थव्यवस्थेला महामारीच्या दबावातून बाहेर काढण्यास मदत होईल.” RBI ने रेपो दरात कोणताही बदल न करण्याची ही 11वी वेळ आहे. गव्हर्नर म्हणतात की,” अर्थव्यवस्था अद्याप महामारीतून पूर्णपणे बाहेर आलेली नाही. अशा परिस्थितीत आर्थिक स्थैर्य राखणे हे आमचे प्राधान्य आहे.”
रिव्हर्स रेपो रेट 40 बेसिस पॉईंटने वाढवला
रिझर्व्ह बँकेने बाजारातील तरलतेचा आढावा घेतल्यानंतर रिव्हर्स रेपो दरात 40 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. आता रिव्हर्स रेपो रेट 3.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. रिव्हर्स रेपो रेट पुन्हा महामारीपूर्वीच्या पातळीवर वाढवावा असा रिझर्व्ह बँकेचा मानस आहे. रिव्हर्स रेपो दर म्हणजे रिझर्व्ह बँकेत पैसे जमा केल्यावर बँकांना व्याज मिळते. आता बँकांनी RBI मध्ये पैसे जमा केल्यास त्यांना वार्षिक 3.75 टक्के व्याज मिळेल.
जूनपर्यंत महागाईपासून दिलासा नाही
गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाईचा सरासरी दर 5.7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रिपोर्ट्स नुसार, पहिल्या तिमाहीतील किरकोळ महागाई विशेषत: त्रासदायक आहे. RBI ने एप्रिल-जूनच्या पहिल्या तिमाहीत किरकोळ चलनवाढीचा दर 6.3 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे, जो 6 टक्क्यांच्या निश्चित श्रेणीपेक्षा जास्त आहे. मात्र, दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) किरकोळ चलनवाढ 5 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचा दावा करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे, ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिसऱ्या तिमाहीत किरकोळ चलनवाढीचा दर 5.4 टक्के आणि जानेवारी-मार्चच्या चौथ्या तिमाहीत 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. गव्हर्नर पुढे म्हणाले की,” RBI अर्थव्यवस्थेबाबत आपला सूक्ष्म आणि वेगवान दृष्टिकोन कायम ठेवेल.”
महागाई हा सर्वात मोठा धोका
गव्हर्नर दास पुढे म्हणाले की,” आर्थिक स्थिरतेच्या मार्गात सध्या महागाई हा सर्वात मोठा धोका आहे. पुढील काही दिवस खाद्यतेलाच्या महागाईचा दर वाढता राहील तर कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल $100 च्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. जोपर्यंत जागतिक बाजारात क्रूडची किंमत कमी होत नाही तोपर्यंत भारतावर महागाईचा विशेष दबाव दिसून येईल, ज्याचा आपल्या आर्थिक सुधारणांवरही परिणाम होईल.”
पहिल्या तिमाहीत 16% पेक्षा जास्त वाढीचा दर
गव्हर्नर दास म्हणाले की,” पहिल्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकास दर 16.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या घसरणीच्या प्रमाणात ही वाढ दिसून येत आहे. मात्र, जुलै-सप्टेंबरच्या दुसऱ्या तिमाहीत विकास दर 6.2 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 4.1 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 4 टक्के राहण्याची अपेक्षा आहे.”