हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ मध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू असा सामना (MI Vs RCB) पाहायला मिळणार आहे. संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा हाय वोल्टेज सामना रंगणार आहे. मुंबईचा राजा रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि आरसीबीचा किंग विराट कोहली (Virat Kohli) यांच्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष्य असेल. दोन्ही संघांची कामगिरी यंदाच्या आयपीएल मध्ये सुमार राहिल्याने आजच्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील.
यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत केवळ दोनच सामने वानखेडे स्टेडियमवर झाले आहेत. दोन्ही वेळी तेज गोलंदाजांना खेळपट्टीची साथ मिळाली होती. आजच्या सामन्यात सुद्धा फास्ट बॉलर्सला मदत मिळण्याची शक्यता आहे. परंतु फलंदाजांनी सुरुवातीला सावधगीरीने खेळ केल्यास नंतर गोलंदाजांवर आक्रमक करणे सोप्पे जाईल. मुंबईच्या संघात जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएट्जे हे दोन्ही गोलंदाज सुरुवातीला आरसीबीच्या फलंदाजांना आऊट करण्यात यशस्वी होतात का ते पाहायला हवं. तर दुसरीकडे आरसीबीच्या ताफ्यात सुद्धा रीस टॉप्ले, मोहम्मद सिराज आणि यश दयाल असे घातक गोलंदाज असल्याने मुंबईच्या सलामीवीरांना सुद्धा सावधगिरीने डावाची सुरुवात करावी लागेल.
दुसरीकडे फलंदाजीबद्दल सांगायचं झाल्यास मुंबई आणि बंगळुरू या दोन्ही संघात आक्रमक फलंदाजांचा भरणा आहे. मुंबईकडे रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि टीम डेव्हिड सारखे जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत जे कोणत्याही क्षणी सामना पलटवण्याची क्षमता राखतात. तर दुसरीकडे आरसीबीच्या संघात विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार फाफ डुप्लेसिस यांच्यावर संपूर्ण मदार असेल. फाफ डुप्लेसिसचा खराब फॉर्म आरसीबी साठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आज मुंबई विरुद्ध विजय मिळवायचा असल्यास डुप्लेसिस फॉर्मात येत बंगळुरू साठी गरजेचं आहे.