CSMT रेल्वे स्थानकावर RDX स्फोटक ठेवल्याची धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील सर्वात गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) रेल्वे स्टेशनवर RDX स्फोटक ठेवल्याचा धमकीचा कॉल (CSMT Station RDX) आल्याने खळबळ उडाली. अज्ञात इसमाने जीआरपी कंट्रोल रूमला फोन करत सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आरडीएक्स ठेवल्याची धमकी दिली. यानंतर संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली. स्टेशनवर सर्वत्र झाडाझडती केली मात्र हाती काहीही लागलं नाही. या सर्व घटनेनंतर पोलिसांनी धमकीचा कॉल करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे आरडीएक्स ठेवल्याबद्दल जीआरपी नियंत्रण कक्षाला कॉल आला. एका अज्ञात व्यक्तीने सीएसएमटी येथे आरडीएक्स ठेवल्याचा दावा केला. या फोन कॉल नंतर जीआरपी पोलिसांनी स्थानिक पोलिसांना आणि बॉम्बशोधक पथकाला याबाबतची माहिती दिली. संपूर्ण सीएसएमटी परिसरात RDX स्फोटकांचा शोध घेण्यात आला, परंतु काहीही सापडले नाही. यानंतर पोलिसांनी सदर धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचे लोकेशन ट्रेस केलं असता सीएसएमटीजवळच असल्याचे स्पष्ट झालं.

कॉल करण्यासाठी वापरण्यात आलेला नंबर मुंबई आणि बिहार या दोन्ही ठिकाणी ट्रेस करण्यात आला होता. अखेर पोलिसांनी काही तासांतच या व्यक्तीला पकडले. सचिन शिंदे असे संशयिताचे नाव असून त्याने आरडीएक्सचा वापर करून सीएसएमटी उडवून देण्याची धमकी दिली होती. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. यापूर्वी सुद्धा पोलिसांना अनेक निनामी कॉल आल्याचे आपण बघितलं आहे. देशाची राजधानी दिल्लीतही बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या गेल्या महिन्यात दिल्या होत्या. मात्र तपासाअंतर्गत हे सर्व निनामी कॉल असल्याचे स्पष्ट झालं होते.