Gudi Padwa 2024| संपूर्ण जगभरामध्ये 1 जानेवारीपासून नववर्षाला सुरुवात करण्यात येते. परंतु मराठी आणि हिंदू नववर्ष हे चैत्र महिन्यापासून सुरू होते. महाराष्ट्रात नवीन वर्षाला गुढीपाडवा सणापासून सुरुवात करण्यात येते. हा सण मोठ्या उत्साहात महाराष्ट्रातील प्रत्येक भागात साजरी केला जातो. या दिवशी घरोघरी गुढी उभारण्यात येते, गोडाचा नैवेद्य बनवला जातो, दारासमोर रांगोळी काढण्यात येते. या सणाचे औचित्य साधून नवनवीन वस्तूंची देखील खरेदी केली जाते.
खास म्हणजे, या सणाच्या दिवशी सर्वाधिक सोने-चांदी खरेदी करण्यात येते. गुढी पाडव्याच्या दिवशी सोने खरेदी करण्याची परंपरा महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून चालत आली आहे. प्रत्येकजण या सणाचे औचित्य साधून आपल्या प्रियजनांसाठी सोने खरेदी करताना दिसते. त्यामुळेच या परंपरेला नेमकी सुरुवात कशी झाली? गुढीपाडव्याच्या सणाला सोने खरेदी का करण्यात येते यामागीच कारण आपण जाणून घेऊया. (Gudi Padwa 2024)
ज्योतिष शास्त्रानुसार, गुढीपाडव्याच्या दिवशी सोने , गाडी किंवा एखादे घर खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळेच नवीन वर्षाच्या निमित्ताने अशा विविध वस्तू खरेदी करण्यावर लोक भर देताना दिसतात. असे म्हणतात, की गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa 2024)शुभमुहूर्तावर सोने खरेदी केल्यामुळे घरातली संपत्ती टिकून राहते. तसेच, लक्ष्मी मातीची कृपा कायम राहते. पूर्वीचे लोक हे कोणत्याही एका सणाचे निमित्त साधून पैशांची गुंतवणूक सोन्यामध्ये करत असत. हीच परंपरा त्यांच्या मुलाबाळांनी देखील पुढे आणली. त्यामुळे आजची पिढी देखील एखादा सण आला की घरामध्ये नवीन वस्तू खरेदी करते. तसेच, आपल्या प्रियजनांसाठी सोने खरेदी करण्यावर कल देते.
त्याचबरोबर सणावाराच्या काळामध्ये सोन्याचे भाव देखील बऱ्याच वेळा उतरलेले असतात. त्यामुळे इतर वेळी सोने खरेदी करण्याऐवजी लोक जास्त प्रमाणात सणावाराच्या दिवशी सोने खरेदी करतात. परंतु, सध्याच्या घडीला गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोने खरेदी करणे ग्राहकांसाठी मुश्किल होऊन बसले आहे. कारण, लोकसभा निवडणुकांमुळे, वाढत्या महागाईमुळे सोन्या चांदीच्या भावांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अशा काळात देखील गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa 2024) दिवशी ग्राहक सोने खरेदी करतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.