सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
रात्रीच्या अंधारात विद्युत तारा तुटून लोंबकळत असताना विद्युत वाहिनी सुरू होते. त्यामुळे माॅर्निंग वाॅकला येणाऱ्या लोकांच्या जीवाशी धोका निर्माण झाला होता. परंतु एमएईसीबीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ कडाक्याच्या थंडीतही घटनेचे गांभीर्य अोळखून गुरूवारी (दि.17) पहाटे पाच वाजता विद्युत पुरवठा खंडित केला. त्यानंतर लोंबकळत आसणाऱ्या तारा उपाययोजना करून व्यवस्थित केल्या. ड्युटी संपवून घरी परतणाऱ्या करंजे महावितरण विभागाचे तानाजी कसबे व त्यांचे सहकारी दशरथ वाघमोडे या एमईसीबीच्या कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेचे सातारकरांनी काैतुक केले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज गुरूवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास साईदर्शन कॉलनी, शाहूपुरी सातारा विद्युत वाहक तार तुटलेली लोंबकळत होती. यावेळी काही नागरिक रात्रगस्त ड्युटी संपवून घरी परतत होते. तेव्हा रस्त्यामध्येच विद्युत वाहक तार तुटलेली व लोबकळत असलेल्या स्थितीमध्ये दिसून आली होती. सदरचे ठिकाणी पूर्णपणे अंधार होता. या ठिकाणी चालत येणाऱ्या व्यक्तीस तसेच मोटरसायकल व चारचाकी वाहनास सदर वायरचा अचानकपणे स्पर्श होऊन गंभीर घटना होण्याची शक्यता होती. याची जाणीव झाल्याने तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य पाहून सातारा मधील पोवई नाका राजवाडा, करंजे या महावितरण विभागास संपर्क केला.
या दरम्यान, रात्री ड्युटीला असणारे महावितरण विभागाचे कर्मचारी यांनी देखील तात्काळ मदत होण्याकरता हालचाली केल्या. महावितरण विभागाची मदत पोहोचेपर्यंत स्थानिक नागरिकांनी स्वतः सदर ठिकाणी थांबून मॉर्निंग वॉक करणारे लोकांना सदरील प्रकारची माहीती देवून दक्षता घेण्याबाबत सूचना केल्या. काही वेळातच करंजे महावितरण विभागाचे तानाजी कसबे व त्यांचे सहकारी दशरथ वाघमोडे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सदरची चालू विद्युत वाहिनी बंद करून प्राथमिक उपाययोजना केली. गेल्या काही वर्षांपूर्वी सदर घटनेपासून काही अंतरावर अशाच प्रकारे पहाटेच्या वेळी चालू विद्युत वाहिनी कडून मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन वयोवृद्ध व्यक्तीं गंभीर जखमी झाल्या होत्या.