हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील.. यावेळेस अगदीच एनडीच्या सहकारी पक्षांच्या जीवावर चालणाऱ्या या मोदी ३.० सरकारमध्ये भाजपला मित्रपक्षांना जास्तीत जास्त जागा सोडाव्या लागल्या आहेत.. महाराष्ट्रातूनही भाजपचे चार, तर रिपब्लिकनचे आठवले तर शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव लवकरच मंत्रीपदाची शपथ घेताना दिसतील… पण या सगळ्यात भलीमोठी रिस्क घेऊन महायुतीत मोठ्या आशेनं आलेल्या अजितदादांच्या पदरात भलामोठा भोपळा पडलाय…शरद पवारांच्या सहानुभुतीच्या लाटेत घड्याळाचे सगळेच उमेदवार वाहून गेेले… त्यातल्या त्यात सुनिल तटकरेंनी रायगडची जागा जिंकत अजितदादांची (Ajit Pawar) कशीबशी लाज राखली… पण असं असूनही रिपब्लिकनच्या आठवलेंना कोणतीही निवडणूक न लढवता मंत्रिपद मिळालं… थोडक्यात भाजपसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वापर आता संपलाय असंही राजकीय विश्लेषक बोलू लागलेत.. मग फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याचा राजकीय अर्थ नेमका कसा काढायचा? अजित पवारांच्या राजकारणाचे काटे लोकसभेच्या निकालाने कसे उलटे फिरवलेत? एवढेच नाही तर अजितदादांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात डावण्याच्या घटनेतच महायुतीच्या फुटीची बीजं रोवली गेली आहेत… अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पडद्याआड काय चाललंय? याच प्रश्नांची सविस्तर उत्तर पाहूयात…
महायुतीच्या जागावाटपात पदरात पडलेल्या चारही जागा प्रतिष्ठेच्या बनवून सुनील तटकरे यांनाच कशीबशी रायगडची जागा वाचवण्यात यश आल्यानं अजित पवारांची राष्ट्रवादी जमिनीवर आलीय…बारामतीतून पत्नी सुनेत्रा पवार यांच्या पराभवाच्या धक्क्यातून अजितदादा अजून सावरलेले नसतानाच मंत्रिमंडळातूनही वगळल्यामुळे आता दादांच्या पायाखालची वाळू सरकलेली असणार, ही वेगळ्या शब्दात सांगायला नकोच… पण घड्याळ, चिन्ह आणि भल्या मोठ्या पक्षातील दिग्गज नेते सोबत असतानाही मंत्रिमंडळातून अजितदादांना नेमकं का डावललं गेलंय? याची काही निश्चितच कारणं सांगता येतील…
त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे लोकसभेत केलेल्या निराशाजनक कामगिरीची
राष्ट्रवादीच्या फुटीत पक्षातील मातब्बर नेत्यांनी अजित पवारांना साथ दिली…आमदार, खासदार आणि पक्षातील पहिली फळीच अजितदादांच्या सोबत आल्याने शरद पवारांना उरल्या सुरल्या नेत्यांना सोबत घेऊन नव्यानं पक्ष उभा करावा लागला… अजित दादा सोबत आल्याने महाराष्ट्र भाजपचाही विश्वास वाढला…महायुतीतील अगदी महत्वाच्या जागा त्यांनी अजित पवारांना दिल्या… स्वतः अजित पवार आणि त्यांच्या सहकारी नेत्यांनी बऱ्याच तोंडाच्या वाफा चालवल्या… मात्र फक्त सुनील तटकरे यांची सीट वगळता, इतर जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार चांगलेच आपटले… हे कमी होतं की काय म्हणून राष्ट्रवादीचा ज्या पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यावर कंट्रोल होता तिथून घड्याळाच्या काट्यांपेक्षा तुतारीचाच आवाज जोरदार चालला… या सगळ्यातून हे क्लियर झालं की नेते अजितदादांच्या सोबत असले तरी कार्यकर्त्यांची फळी आजही शरद पवारांच्या सोबतच आहे…लोकसभेच्या निकालाने अजित पवार गट राज्याच्या राजकारणात सर्वात मागे असल्यावर जणू मोहोरच उमटली… यामुळेच त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नसावं…
यातलं दुसरं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे विधानसभेला पॉवर पॉलिटिक्सची खेळी..
होय…अजितदादांना एकच जागा जिंकता आली असली तरी राष्ट्रवादीने केवळ चारच जागा लढवल्या होत्या हे विसरून आपल्याला चालणार नाही… त्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने लढवलेल्या जागा आणि जिंकलेल्या जागा यांच्यातही मोठा फरक असल्याने राष्ट्रवादीच्या एका जागेकडे अपयश म्हणून बघता येणार नाही… मुळात मंत्रिपद न घेण्याची अजितदादांची ही एक पॉलिटिकल स्ट्रॅटर्जी असू शकते… फडणवीसांनी सांगितलं तसं अजित पवार गटाला भाजपकडून राज्यमंत्रीपद ऑफर करण्यात आलं होतं मात्र राष्ट्रवादी कॅबिनेट मंत्रीपदासाठी अडून बसल्याने अजितदादांचा खासदार या मंत्रिमंडळात शपथ घेताना दिसणार नाहीये…म्हणजेच अजित पवार गट मुद्दामहून मंत्रिपद स्वतःकडे घेत नाहीये… पण याच्या बदल्यात विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागांची बुलिंग करण्याचा अजितदादांचा डाव असू शकतो… तसं बघितलं तर अजितदादांना दिल्लीतील राजकारणापेक्षा महाराष्ट्रातील राजकारण जास्त प्रिय आहे.. म्हणूनच सध्या केंद्रीय मंत्रीपदावर पाणी सोडून, येणाऱ्या विधानसभेला आपल्याला जास्तीत जास्त आमदार निवडून पराभवाचा वचपा कसा काढता येईल, याचा अजितदादांच्या डोक्यात विचारा असावा…
आता पाहुयात शेवटचं कारण ते म्हणजे महायुती ब्रेक होणं…
दोन पक्षांची फोडाफोडी करून महायुती म्हणून एकत्र लढल्यामुळे त्याचा शिंदे, अजितदादा आणि भाजपालाही मोठा लॉस झाला… थोडक्यात सत्तेच्या हव्यासापोटी घडवून आणलेली ही युती महाराष्ट्राच्या जनतेला फारशी काही पचनी पडली नसल्याचं या निकालातून स्पष्ट झालय… त्यात लोकसभेला झाला तसा विधानसभेला होणारा जागा वाटपाचा तीढा आहेच… त्यामुळे या सगळ्या बाबींचा एकंदरीत विचार केला तर विधानसभेला एकत्रित लढण्यापेक्षा वेगळा निर्णय घेण्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार असू शकतो… त्याचीच पायाभरणी अजित पवारांनी मंत्रीपद नाकारून केली असावी… पण समजा मंत्रीपद द्यायचं झालंच तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांपैकी नक्की कुणाला संधी द्यायची? हाही प्रश्न आहेच… त्यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभेतील पराभवाच्या धक्क्यामुळे अजित पवार मंत्रिपद न घेता वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहेत… पण येत्या काळात अजित पवार काही मोठा निर्णय घेतील, असं चित्र सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळतय… त्यामुळे राष्ट्रवादीला न मिळालेल्या मंत्रीपदाचा राजकीय अर्थ तुम्ही कसा काढाल? तुमचं मत, प्रतिक्रीया आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा