महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर शहर व परिसरात कोसळणाऱ्या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वेण्णा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने महाबळेश्वर- पाचगणी रस्ता काही काळ बंद करण्यात आला होता. तसेच वाहतूक ही मंदावली होती. तर महाबळेश्वर परिसरातील पावसाच्या थैमानाने वीजपुरवठा खंडीत झालेला आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या चोवीस तासांत 164 मि. मि पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर शहर व परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. तर हवामान खात्याने 5 दिवसाचा सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाचे ठिकाण हे महाबळेश्वर आहे, या परिसरात पावसाने थैमान घातले आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरु झालेला पाऊस धुवांधार पणे सुरूच असून जोरदार वाऱ्यासोबत मुसळधार कोसळणारा पावसामुळे अवघे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संततधार पावसाने महाबळेश्वर पांचगणी मुख्यरस्ता हा वेण्णालेक नजीक मंगळवारी सायंकाळी पाण्याखाली गेला होता. तर, बुधवारी सकाळी व सायंकाळी देखील धुवांधार पावसामुळे मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीकाळ मंदावली होती. या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत होती.
व्हिडिअो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/544490743414122
तसेच आंबेनळी घाटात व मेढा केळघर घाटात रस्त्याच्या रूंदीकरणाच्या कामामुळे व तापोळा रस्त्यांवर किरकोळ प्रमाणात दरड कोसळत असल्याने वाहतूक सावधगिरीने करावी लागत आहे. संततधार पावसाने महाबळेश्वरचे निसर्गवैभव खुलले आहे. पावसाळी हंगामास बहर आला आहे. येथे पर्यटनास आलेले पर्यटक या मुसळधार कोसळणाऱ्या पावसात मनमुराद भिजण्याचा आनंद लुटत आहेत. येथील वेण्णा नदी देखील पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहेत. तसेच परिसरातील धबधबे देखील मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहेत.
पावसाच्या थैमानाने वीजपुरवठा खंडीत
सातारा जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला आहे. महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. तालुक्यात पडत असलेल्या या पावसामुळे वीजपुरवठा खंडीत झालेला आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावे अंधारात आहेत.