कोविड रूग्ण मृत्यू दर कमी करा – जिल्हाधिकारी

sunil chavhan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम केलेली आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कारणांचा शोधदेखील घेतलेला आहे. या अभ्यासातून आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत आरोग्य यंत्रणांनी कार्यवाही करावी; त्यामुळे जिल्ह्यात कोविड रुग्णाचा मृत्यू होणार नाही, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय कोविड आढावा बैठक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, संगीता सानप, रिता मैत्रेवार, संगीता चव्हाण, मंदार वैद्य, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. नीता पाडळकर, पर्यटन विभागाचे उपसंचालक श्रीमंत हारकर, डॉ. लड्डा, डॉ. विजयकुमार वाघ, अजोय चौधरी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, कोविड-19 विषाणूच्या प्रसारामुळे अनेकजणांना कोरोना आजारामुळे जीव गमवावे लागले. कोरोना आजारावर वेळेत, योग्य उपचार घेतल्याने जिल्ह्यातील एक लक्ष 43 हजार 550 रूग्ण बरे झाले. सध्या जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या कमी होते आहे. परंतु अजूनही कोविडचा धोका कमी झालेला नाही. त्यामुळे सर्व नागरिकांनी मास्कचा वापर, शारीरिक अंतर, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करावे. त्याचबरोबर प्राधान्याने लसही घ्यावी.
आरोग्य विभागाने पॉझिटिव्ह असलेल्या कोविड रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घ्यावा. नागरिकांच्या चाचण्या करण्यावर अधिकाधिक भर द्यावा. रिक्षा चालक, भाजी विक्रेते, दूध विक्रेते, दुकानदार आदी सुपर स्प्रेडर असणाऱ्या व्यक्तींचीही चाचणी करावी. म्युकरमायकोसिसच्या आवश्यक औषधी उपलब्धतेबाबतही खात्री करावी. जिल्ह्यात 24 ठिकाणी ऑक्सीजन प्लांटची उभारणी करण्यात येत आहे. त्यापैकी चार प्लांट उभारलेले आहेत. उर्वरीत प्लांट लवकरात लवकर उभारावेत, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. बैठकीत डॉ.येळीकर, डॉ. मंडलेचा, डॉ. कुलकर्णी, डॉ. पाडळकर यांनीही कोविडबाबत जिल्हाधिकारी चव्हाण यांना करावयाच्या आवश्यक उपाययोजनांबाबत माहिती दिली.

• डॉक्टरांना प्रशिक्षण –
संभाव्य तिसऱ्या लाटेचा बालकांना धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत असल्याने त्या दृष्टीनेही प्रशासनाने उपाययोजना केलेल्या आहेत. यामध्ये आयसीयू, व्हेंटीलेटरसह एकूण 631 बेड बालकांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये 45 व्हेंटीलेटरचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अजून 28 व्हेंटीलेटर सीएसआर निधीतून उपलब्ध झालेले आहेत. जवळपास 300 डॉक्टरांना लहान बालकांना हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.