सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात असणाऱ्या दुर्गम भागातील खिरखंडी येथील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास सुरू असल्याची घटना समोर आली होती. यानंतर अनेक ठिकाणाहून या विद्यार्थ्यांना मदतीचा ओघ सुरू झाला होता. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई हायकोर्टाने देखील या बाबतची दखल घेऊन सुमोटो याचिका दाखल करत जिल्हा प्रशासनाला योग्य त्या सोयीसुविधा पुरवण्याचे आदेश बजावले होते. त्यानुसार येत्या आठ दिवसात खिरखंडी गावचा प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी सांगितले.
सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत बहुतांश कुटुंबांचे पुनर्वसन झालेले असून त्यापैकी अजूनही सहा कुटुंब हे मूळ खिरखंडी या गावी वास्तव्य करत आहेत. सातारा जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी देखील खिरखंडी येथे जाऊन त्याठिकाणी राहत असलेल्या कुटुंबांची भेट घेतली. पुढील आठवड्यापर्यंत खिरखंडी गावचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/830833764941782
रूचेश जयवंशी म्हणाले, आम्ही संपूर्ण जिल्ह्याची यंत्रणा घेवून खिरखंडी येथे गेलो होतो. ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी गेलो होतो. या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही लवकरच तोडगा काढणार आहोत. सध्या आश्रमशाळेत मुलांना थांबण्यासाठी पालकांनी परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता दररोज पाण्यातून प्रवास करावा लागणार आहे. गावकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्याचा विचार सुरू आहेत. आधी दिलेल्या ठिकाणावरील जागेवर ते जावू शकतात. परंतु सर्व ग्रामस्थांना एकाच ठिकाणी जायचे आहे.