सांगली प्रतिनिधी । दोन भाऊ भांडून वेगळे रहात असले तरी शिवसेनेशी भावनिक नाते कायम आहे. त्यामुळे भविष्यकाळात भाजप-शिवसेना एकत्र येतील का? की येणार नाही, हे काळच ठरवेल, असं विधान मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. महाविकास आघाडीने आमच्या कारभाराच्या चौकशीची भिती दाखवू नये, चौकशीला आम्ही घाबरत नाही, चौकशी करा पण त्याचा तत्काळ अहवाल सादर करून दाखवा, असे आव्हान चंद्रकांतदादांनी महाआघाडीच्या नेत्यांना दिले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे सांगली दौयावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मोदी-ठाकरे भेटीबाबत ते म्हणाले की, ”मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तातडीने ठाकरे यांनी पंतप्रधानांची सदिच्छा भेट घ्यायला हवी होती, पण शरद पवार, बाळासाहेब थोरात काय म्हणतील म्हणून ते थांबले असावेत. पण आता त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय असो अथवा नागरिकत्वाचा मुद्दा असो, ते स्पष्ट भूमिका घेत आहेत. मोदी आणि त्यांच्यात भावाचेच नाते असल्याचं” त्यांनी सांगितलं.
वृक्षलागवड, जलयुक्त शिवार असे जनतेच्या हिताचे अनेक निर्णय भाजपने सत्ताकाळात घेतले होते. महाआघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून मागच्या सरकारचे निर्णय रद्द करण्यापलीकडे कोणताच निर्णय झालेला नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफीही फसली आहे. महिलांवर अत्याचार वाढले आहेत. या सगळ्याविरोधात २५ फेब्रुवारी रोजी राज्यभर आंदोलन करणार असल्याचा पुनरुच्चारही पाटील यांनी केला.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.